पीआय गणेश अणेविरुध्द युवा सेनेचे उपोषण
By admin | Published: January 27, 2015 11:24 PM2015-01-27T23:24:20+5:302015-01-27T23:24:20+5:30
शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची रवानगी करुन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी युवा सेनेने
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची रवानगी करुन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी युवा सेनेने गणतंत्रदिनापासून बेमुदत उपोषण आरंभले आहे.
अणे हे नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ‘सोफिया’त जाणाऱ्या कोळशांच्या ट्रकवर त्यांनी संशयास्पद कारवाई केली. बिजीलॅन्ड या व्यापारी संकुलामध्ये झालेल्या हाणामारीत दंगल माजविण्याचा प्रयत्न करुन थातुरमातूर कारवाई केली, असा आरोप युवा सेनेने केला आहे. त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. तथापि, अणे यांचे पोलीस आयुक्तांशी घनिष्ठ संबध असल्यामुळे त्यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेची सूत्रे सांभाळल्यानंतर अणे यांनी श्रीसूर्या फायनान्स कंपनी, वासनकर इन्व्हेस्टमेंटस आणि राणा लॅन्डमार्क या प्रकरणांतील आरोपींची पाठराखण केली. तपासात संशयास्पद भूमिका वठविली, असाही आरोप करण्यात आला आहे.
या गैरप्रकाराबद्दल युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांकडेही तक्रारी केल्यात. योग्य कारवाई न करण्यात आल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला, अशी भूमिका राहुल नावंदे यांनी निवेदनाव्दारे स्पष्ट केली आहे.