फोटो पी १५ युनुसशहा
अमरावती : अब्बू जब देखो तब कम्प्युटर पे लगे रहते है… कोरोना साथीच्या काळात गत वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या युनुस शहा यांची ॲनी अस्मिर ही चार वर्षांची चिमुकली सांगत होती. कोरोना साथीच्या काळात आयसीएमआर व आरोग्य यंत्रणेसाठी डेटा संकलनाची व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या युनूस शाह यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी झाली.
शहा हे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत. कोविडबाधितांवरील उपचारांना गती देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेचे काम विविध पातळ्यांवर सुरू असते. सीएस ऑफिसमधील सहकाऱ्यांना कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल वेळोवेळी मिळवणे, याद्या तयार करणे, त्यासाठी लॅब, रुग्णालये व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय राखणे, आयसीएमआर पोर्टलसाठी डेटा संकलन करणे, त्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन तशा नोंदी घेणे अशी अनेकविध कामे अव्याहतपणे करावी लागतात.
दवाखान्यांत नवे रुग्ण येणे, नव्या चाचण्या, नवे निष्कर्ष प्राप्त होणे, नव्याने काही दुरुस्त्या कराव्या लागणे हे सातत्याने सुरूच असते. या सगळ्या नोंदी त्या-त्या वेळीच घ्याव्या लागतात. त्यामुळे थांबून चालत नाही. सगळ्या बाबी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे मी व माझ्या सहकार्ऱ्यांंनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. गौरव इंगळे, शिवानी गहलोत, अविनाश शेंडे, साखरकर मॅडम, श्रीकांत शहाणे, दीपक लकडे, विशाल काळे, अनिकेत खाडे असे अनेक सहकारी कोविड रिपोर्टिंग सेंटरमध्ये अविरत कार्यरत असल्याचे युनूस शाह सांगत होते.
डेटा ‘अपडेशन‘ सतत
जे काम जी व्यक्ती करते, तिने एक दिवसही थांबून चालत नाही. कारण, त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धती, आयसीएमआरचे नियम, रुग्णालयांची माहिती व समन्वय प्रक्रिया याबाबतची अनेकविध प्रकारची माहिती ते काम नित्य करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच अधिक चांगले अवगत असते. साथीच्या या काळात हे काम अधिकाधिक निर्दोष होणे आवश्यक आहे. त्यामुळे रजा घेता येत नाही व अनेक कामे एकहातीही करावी लागतात. सायंकाळी ऑफिस सोडले तरी घरी गेल्यावर उशिरापर्यंत काम सुरूच असते. सकाळी उठल्यावरही माहिती अपडेशनचे काम सुरू होते.
घरी गेल्यावर कुटुंबासोबत असतो, मात्र, कार्यालयीन काम सुरूच ठेवावे लागते. मध्ये-मध्ये मुलांशी खेळायला मिळतो. युनूसला ॲनी अस्मिर ही चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा अकदस हा मुलगा आहे. आज मुलांसोबत राहून पण आपले कार्यालयीन कर्तव्य पूर्ण करून युनूसने ईद साजरी केली. अब्बू जब देखो तब कम्प्यूटर पे लगे रहते है, अशी त्याच्या चिमुकलीची प्रतिक्रिया उमटली.