- संदीप मानकरअमरावती : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा झळ पोहोचली आहे. यापैकी तीन जिल्ह्यांतील मोठे व मध्यम अशा एकूण आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या धरणांचाही समावेश आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या धरणांचा समावेश आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ५९.९७ दलघमी आणि खडकपूर्णा धरणाचा ९३.४० दलघमी आहे. पण, आजचा उपयुक्त पाणीसाठा हा शून्य दलघमी आहे. त्या कारणाने या जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षी धरण परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.सहा मध्यम प्रकल्पांची परिस्थितीसुद्धा चिंताजनक आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. घुंगशी बॅरेजमध्येसुद्धा यंदा पाणी नाही. वाशिम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प, बुलडाणा जिल्ह्यातील मस धरण, कोराडी व तोरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.------------काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा हा शून्य टक्क्यांवर आला आहे. धरण पूर्ण झाले असले तरी उर्वरित इतर कामांना सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग
पश्चिम विदर्भातील आठ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 8:18 PM