जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या.
" अटलबिहारी वाजपेयी हे एक महान व्यक्तीमत्व होते. हे सुवर्णपदक मी त्यांना समर्पित करतो. देशाला मी सुवर्णपदक जिंकवून देऊ शकलो, याचा मला अभिमान आहे. अंतिम फेरी चांगली झाली. माझ्याकडून चांगला सराव झाला होता. त्यामुळेच मला हे सुवर्णपदक पटकावता आले, " असे नीरजने सुवर्णपदक पटकावल्यावर सांगितले.
भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. नीरजने यावेळी 88.06 मी भाला फेकला आणि भारताला आठवे सुवर्णपदक जिंकवून दिले.