अपघात दिसताच ताफा थांबवला; केंद्रीय मंत्री भागवत कराडांमधील ‘डॉक्टर’ उपचारासाठी तत्काळ धावला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 12:57 PM2021-10-25T12:57:24+5:302021-10-25T13:08:29+5:30
Union Minister Bhagwat Karad: डॉ. भागवत कराड यांनी अपघात पाहून तातडीने घेतलेली धाव अनेकांना माणसुकीचे दर्शन देणारी ठरली.
औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांच्यातील ‘डॉक्टर’ रविवारी एका अपघातप्रसंगी उपचारासाठी धावल्याने त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांनी अनुभवले. केंद्रीय मंत्र्यांआधी डॉक्टर असलेले कराड यांना अपघात पाहून राहावले नाही. त्यांनी ताबडतोब जखमी मुलाला तपासले. जखमी किंवा रुग्णाला पाहून तातडीने धावून जाण्याला वैद्यकीय पेशात फार महत्त्व असते. राजकारणात गेल्यानंतर अनेक जण आपल्या मूळ व्यवसायापासून दूर जातात. परंतु डॉ. कराड यांनी अपघात पाहून तातडीने घेतलेली धाव अनेकांना माणसुकीचे दर्शन देणारी ठरली.
व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ असलेले डॉक्टर आता केंद्रात अर्थराज्यमंत्री आहेत. धावपळीचा आणि व्यस्ततेचा त्यांचा दिनक्रम. शहरात दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे ते रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुभेदारी विश्रामगृहाच्या दिशेने जात असताना त्यांच्यासमोर अचानक एक रिक्षा उलटली. डॉ. कराड यांनी ताबडतोब आपला ताफा थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली. २ लहान मुले जखमी झाली होती. डॉ. कराड यांनी स्वत:च्या खिशातील रुमाल काढून जखमी मुलाच्या ओठातून येणारा रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वाहनाच्या दिशेने नेले. तितक्यात त्या मुलाचे नातेवाईक आले. त्यांच्यासमोर डॉ. कराड यांनी मुलाला डोक्याला काही मार लागला आहे का, हे तपासले.
समोर अपघात झाल्यास मदत करा
वाहने जपून चालवा. कुठलाही अपघात आपल्यासमोर झाल्यास जखमींची मदत करा. असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. तसेच अपघातात जखमीच्या डोक्याला मार लागला आहे का, यासाठी जागेवरच तपासणी केली. परंतु तसे काही नसल्यामुळे मुलांना कुटुंबीयांकडे सोपविले.