सदनिका धारकांची लेबर कॉलनीत आज शेवटची सायंकाळ; उद्या पहाटेपासून सुरु होणार पाडापाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:52 AM2022-05-10T11:52:17+5:302022-05-10T11:53:47+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार सदनिकाधारकांना स्वत: हून घरे रिकामी करणे बंधनकारक, तसे न झाल्यास पोलीस बळाचा वापर
औरंगाबाद : विश्वासनगर-लेबर कॉलनीतील सदनिकांचा ताबा नागरिकांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत स्वत: हून सा. बां. विभागाकडे द्यावा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने शांतता राखण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांततेत ताबा द्यावा, अन्यथा बुधवारी जिल्हा प्रशासन पहाटे ६ वाजेपासूनच पाडापाडीच्या कारवाईला सुरुवात करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईत अडथळा आल्यास पोलीस बळाचा वापर होईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लेबर कॉलनीच्या कारवाईच्या नियोजनासाठी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची शेवटची बैठक घेऊन ११ मे रोजी होणाऱ्या कारवाईबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी म्हणाले, साडेतेरा एकरवरील सरकारी निवासस्थाने सेवानिवृत्तीनंतर रिकामी करणे आवश्यक होते. परंतु विलंबाला बांधकाम विभागही जबाबदार आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार तेथील सदनिकाधारकांना स्वत: हून घरे रिकामी करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास पोलीस बळाचा वापर करून घरे रिकामी करून त्यावर हातोडा चालविला जाईल.
कारवाई दरम्यान वाहतूक वळविणार
लेबर कॉलनीच्या बाजूने शहरात जाणारे दोन मुख्य रस्ते आहेत. जळगावकडून येणारा रस्ता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणारा रस्ता. यावर सार्वजनिक व खासगी वाहतूक आहे. कारवाईच्या काळात या भागातून वाहतूक सुरू राहिल्यास अडथळा होण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात येईल. लेबर कॉलनीकडे जाणारे सर्व रस्ते बुधवारी बॅरिकेटिंगने बंद केले जातील.
लेबर काॅलनी परिसरात उद्या कलम १४४ लागू
दरम्यान, विश्वासनगर, लेबर कॉलनी येथे शासकीय निवासस्थानाची निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या काळात लेबर कॉलनीच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी लागू केले आहे.
पाडापाडीसाठी ही यंत्रणा
अधिकारी-९५
मनुष्यबळ- ४००
जेसीबी-१२
पोकलेन-५
रुग्णवाहिका-८
डॉक्टर-४