नवी दिल्ली : गेल्या 20 वर्षांपासून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या मारुतीच्या वॅगन आर या कारला आज लूक बदलून पुन्हा लाँच करण्यात आले. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कारपेक्षा हा लूक वेगळा देण्यात आला आहे. ही कार स्विफ्टप्रमाणेच हर्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या कारचे दोन इंजिनसह सात व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत.
1 लिटरचे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन इंजिन, 1 लिटरचेच अॅटोमॅटीक, 1.2 लीटर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन इंजिन आणि 1.2 लीटर पेट्रोल अॅटोमॅटीक देण्यात आले आहे. 1 लिटरचे पेट्रोल मॅन्युअल इंजिनाच्या मॉडेलची किंमत LXI 4.19 लाख रुपयांपासून सुरु होते. तर VXI व्हेरिअंटची किंमत 4.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अॅटोमॅटीकची किंमत 5.16 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
1.2 लीटर पेट्रोल मॅन्युअलची किंमत 4.89 लाख रुपयांपासून सुरु होते. नव्या वॅगन आर मध्ये एलईडी टेललँप्स आणि नवीन ओआरव्हीएम देण्यात आला आहे. बॉक्सीपणा जाण्यासाठी पत्रा छोडा मोल्ड करत फुगीरपणा आणण्यात आला आहे.
डॅशबोर्डही नवीन देण्यात आला असून स्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह एबीएस, इबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि रिअर पार्किंग सेन्सर देण्यात आला आहे. मात्र, एअरबॅग ड्रायवरकडेच स्टँडर्ड देण्यात आली आहे. बाजुच्या पॅसेंजरसाठी वरच्या मॉडेलमध्ये एअरबॅग पर्याय देण्यात आली आहे.