नवीन कारपेक्षा जुन्या कार्सला मागणी अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:17 AM2018-10-23T05:17:00+5:302018-10-23T05:17:09+5:30
जुन्या (प्री-ओन्ड) कार्सची खरेदी-विक्री नवीन गाड्यांपेक्षाही अधिक होत आहे. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
मुंबई : जुन्या (प्री-ओन्ड) कार्सची खरेदी-विक्री नवीन गाड्यांपेक्षाही अधिक होत आहे. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
२०१७-१८ मध्ये देशभरात ३६ लाख जुन्या गाड्यांची विक्री झाली. त्या वर्षात नवीन कार्सची विक्री मात्र ३२ लाखच होती. ३६ लाख गाड्यांमार्फत या क्षेत्रात ९० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. आता या आर्थिक वर्षात ही उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्यावर जात आहे. वॅगन-आर, स्विफ्ट व सॅन्ट्रो या श्रेणीतील जुन्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. २०१७-१८ मध्ये ज्या ३६ लाख गाड्या विक्री झाल्या, त्यापैकी ६० टक्के गाड्या या तीन श्रेणीतील होत्या, असे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले.
आता महिंद्रा, होंडा, मारुती सुझुकी, टोयोटा यासारख्या मोठ्या कंपन्याही जुन्या गाड्यांच्या विक्रीत उतरल्या आहेत. सर्वच मोठ्या कंपन्यांनी जुन्या गाड्यांच्या विक्रीसाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. हे क्षेत्र दरवर्षी १० ते १५ टक्के वाढत आहे. पुढील तीन ते चार वर्षात सध्यापेक्षा दुप्पट जुन्या गाड्यांची विक्री होईल, असे मत डीलर्सने व्यक्त केले आहे.
>विमा नवीन गाडीच्या तुलनेत असतो स्वस्त
आपल्या घरी स्वत:ची चारचाकी असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण भरमसाठ वाहतूक कर व महागडा विमा यामुळे नवीन गाडी खरेदी करणे शक्य नसते. जुन्या गाड्यांची किंमत नवीन गाडीच्या तुलनेत जवळपास अर्धी असते. त्यामुळे त्यांचा विमा नवीन गाडीच्या तुलनेत स्वस्त असतो. कागदपत्रेही आधीच तयार असल्याने कर्ज सहाय्यसुद्धा तात्काळ मिळते. यामुळेच जुन्या गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.