पावसापूर्वी कारची जरी सारी दक्षता घेतली तरी प्रत्यक्ष पावसामध्ये कार रस्त्यावर चालवणे हा अनुभव वेगळा असतो. तुम्हाला तुमच्या कारची नस अन नस माहिती असली तरी पावसामुळे रस्त्याची झालेली परिस्थिती, त्यामुळे वाहन चालवतानाही येणारे अडथळे व त्याला कार कशाप्रकारे पडसाद देते, तुम्ही त्या स्थितीला कशाप्रकारे स्वीकारता व प्रतिक्रिया म्हणून ड्रायव्हिंग कशा पद्धतीने करता हे सर्वात महत्त्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये ड्रायव्हिंगमध्ये येणारे अडथळे हा या पुढचा भाग आहे. यासाठीच पावसाळ्यामध्ये केले जाणारे ड्रायव्हिंग हे अतिशय सावध हवे. पाऊस पडताना ड्रायव्हिंग कौशल्यही त्या त्या वेळेनुसार दाखवावे लागते. मुसळधार पाऊस असताना वायपरचा वेग जास्त असला तरीही काहीवेळा समोरची दृश्यमानता अतिशय कमी असते. रस्त्यामध्ये दुभाजक नसले तर त्यावेळी हेडलॅम्प डिपरमध्ये ठेवा, त्यामुळे समोरून येणाऱ्या अन्य वाहनालाही तुम्ही दिसाल. रस्त्यामध्ये असणारे खड्डे अशावेळी दिसतही नाहीत, रस्त्याचे कोपरे, रस्त्याच्या कडा दिसत नाहीत, रात्र वा दिवसाही मुसळधार पाऊस असताना या गोष्टींचा पूर्ण अंदाज येऊ शकत नसल्याने ड्रायव्हिंग अतिशय सावधपणे करणे गरजेचे असते.काहीवेळा रस्त्यावर असलेले खड्डे पाण्याने भरलेले असतात पण ते किती खोल आहेत, ते समजू शकत नाही, यासाठी अतिशय दक्षतेने वाहन हाताळा. खड्ड्यांच्या रस्त्याच्या चालनामध्येही विनाकारण गती वाढवू नका, दुसऱ्या गीयरमध्ये चालन करा. शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले असते तेव्हा त्या पाण्याचा अंदाज नसतो, त्यामध्ये कुठे पोर्टहोल उघडे असतात ते कळत नाही, अशावेळी शक्यतो कार त्या रस्त्याचा पूर्ण अंदाज घेऊन मगच पुढे सरकाावे. तुंबलेल्या पाण्यातून जाताना सावधपणाबरोबरच पाणी सायलेन्सरमध्ये शिरणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यावेळी गाडीचा एक्सरेटर दाबत राहून नियंत्रितपणे तुंबलेल्या पाण्यातून बाहेर यावे. कारमध्ये दरवाज्यातून पाणी येणार असेल तर पाण्यात कार घालू नये. गाडीचा वेग शहरात व शहराबाहेर हायवेवरही नियंत्रित असावा. महामार्गावर पाणी साचलेले असताना त्या ठिकाणी नको ते धाडस करू नये. पूल, गार्डस्टोन यावरून पाणी वाहात असेल तर कार पार करताना पाण्याचा स्तर व वेग याचा अंदाज घ्यावा. शक्यतो त्या रस्त्यावर कार पुढे नेऊ नये. सुरक्षित ठिकाणी राहावे. तसेच चिखल रस्त्यावर असेल तर त्यावरून अतिशय हळूवार ड्राइव्ह करावे. मातीच्या रस्त्यावरून जातानाही सावधानता बाळगावी. पावसाळ्यात कार व आपल्या स्वतःला जपूनच ड्राइव्ह करणे हे केव्हाही हिताचे व सुरक्षिततेचे आहे.
पावसाळ्यातील ड्रायव्हिंग... जरा जपून बरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:54 AM