FASTag स्कॅन झाला नाही? चकटफू जा! उद्यापासून ऑफर लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 07:21 PM2020-01-14T19:21:20+5:302020-01-14T19:27:00+5:30
उद्यापासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. जर फास्टटॅग टोलनाक्यांवरील स्कॅनरद्वारे स्कॅन झाला नाही तर काय करायचे? दुप्पट टोलचा भुर्दंड सोसायचा की एकदाच टोल द्यायचा असा प्रश्न वाहनचालकांना पडला होता.
मुंबई: राष्ट्रीय महामार्गांवर फास्टटॅग उद्यापासून बंधनकारक केले जाणार आहेत. त्रुटींमुळे डेडलाईन दोनवेळा वाढविण्यात आली होती. आज ही मुदत संपत आहे. अशावेळी जर फास्टटॅग नसेल तर चालकाला दुप्पट टोल आकारला जाणार आहे. पण जर फास्टटॅग स्कॅनच झाला नाही, तर वाहनचालकांसाठी खूशखबर आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज मोठी घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी फास्टटॅग स्कॅनच होत नव्हते. यामुळे टोलनाक्यांवरील यंत्रणा कुचकामी ठरल्याने वाहनचालकांना नेहमीच्या कॅश देण्यापेक्षा जास्तीचा वेळ थांबावे लागत होते. यामुळे फास्टटॅग असूनही मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे एनएचएआयवर टीका होत होती. यामुळे 15 जानेवारीला फास्टटॅगची यंत्रणा कार्यरत करण्यात येणार होती.
उद्यापासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. जर फास्टटॅग टोलनाक्यांवरील स्कॅनरद्वारे स्कॅन झाला नाही तर काय करायचे? दुप्पट टोलचा भुर्दंड सोसायचा की एकदाच टोल द्यायचा असा प्रश्न वाहनचालकांना पडला होता. यावर एनएचएआयने भन्नाट ऑफर दिली आहे. एनएचएआयने काढलेल्या अधिसूचनेमध्ये (National Highway Fee Determination of Rates and Collection Amendment Rule 2018 GSR 427E 07.05.2018) जर एखाद्या टोलनाक्यावर फास्टटॅगची यंत्रणा असेल आणि ती वाहनावरील फास्टटॅग स्कॅन करण्यास अपयशी ठरली असेल तर त्या वाहनाला फुकटात म्हणजेच टोलमुक्त प्रवास करू द्यावा असे म्हटले आहे.
वाहन चालकांचा वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. जर फास्टटॅगच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम असेल आणि जर ती रक्कम कापण्यात स्कॅनर अपयशी ठरला असेल तर त्या वाहन चालकाला कोणतीही रक्कम न घेता मोफत सोडण्यात यावे. त्याला यासाठी शून्य व्यवहार अशी नोंद असलेली रिसिप्ट देण्यात यावी, असे या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. मात्र, यासाठी फास्टटॅग योग्य जागी चिकटविणे गरजेचे आहे.
दुप्पट टोल'दंड' वाचणार; FASTag आता भीम अॅपद्वारेही रिचार्ज करता येणार
मुंबई टोलनाक्यांवर जानेवारीपासून फास्टॅग
‘फास्टॅग’ म्हणजे काय?
फास्टॅगचे एक डिजिटल स्टिकर प्रत्येक वाहनावर चिकटविण्यात येणार असून ते संबंधित वाहनधारकाचे बँक खाते किंवा इतर खात्यासोबत लिंक असणार आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. या प्रक्रियेमध्ये संबंधित वाहन टोल नाक्यावरून जाताना तेथील कॅमेऱ्यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून ही टोलची रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना टोल भरण्यासाठी मोठ्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.