पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींनी त्रस्त असलेल्या भारतीयांना या महिन्यात मोठी भेट मिळणार आहे. महागडे इंधन भरण्याऐवजी वाहन चालकांना इथेनॉल भरण्याचा पर्याय मिळणार आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी या महिन्यात फ्लेक्स फ्युएलवर चालणार कार लाँच करणार आहे.
जपानी कार कंपनी टोयोटा आपल्या देशातील पहिली फ्लेक्स फ्यएल कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लाँच करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून गडकरी फ्लेक्स फ्युएल कारसाठी कार कंपन्यांवर दबाव टाकत होते. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठी मदत मिळणार असून देशाची अर्थव्यवस्था देखील सुधारणार आहे.
ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ६२ व्या वार्षिक अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. देशातील 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल, डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे होते. अशा परिस्थितीत इथेनॉलसारखे इंधन विकसित केले पाहिजे जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि त्याच वेळी ते जीवाश्म इंधनांपेक्षा स्वस्त आणि स्वदेशी असेल.
अमित शहा काय म्हणाले...सरकारने 2020 मध्येच फ्लेक्स इंधनाबाबत आपली योजना जाहीर केली होती. 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य 2030 पर्यंत ठेवण्यात आले होते, जे नंतर 2025 पर्यंत करण्यात आले. 2025 पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठल्यास, देशाच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच म्हटले आहे. तसेच, आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन पेट्रोलियम क्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलेल. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल.' एथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना लगाम लावण्यासहही मदत मिळेल.
अमित शाह म्हणाले, कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैविक इंधन एक चांगला पर्याय आहे. याचे उत्पादन 2011-12 मधील 17.2 कोटी टनावरून वर्ष 2021-22 मध्ये 21.2 कोटी टन झाले आहे. जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने हे साध्य करण्यासाठी सिस्टिमॅटिक आणि वैज्ञानिक इथेनॉल नीती तयार केली आहे.' याच बरोबर, 'एवढे प्रयत्न करूनही, अमेरिका 55 टक्के इथेनॉलचे उत्पादन घेते. ब्राझील 27 टक्के तर भारत तीन टक्के इथेनॉलचे उत्पादन करते, असेही शाह म्हणाले.