खुशखबर! मध्य रेल्वेच्या 'या' नऊ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 08:27 AM2022-09-14T08:27:20+5:302022-09-14T08:28:05+5:30
वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
मुंबई : चार्जिंग सुविधेअभावी इलेक्ट्रिक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता मध्य रेल्वेच्या नऊ स्थानकांत चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर, भायखळा, परळ, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण आणि पनवेल या स्थानकांचा समावेश आहे. चार्जिंगची सुविधा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल.
वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. या उपक्रमामुळे इलेक्ट्रिक वाहतुकीला गती मिळणार आहे. मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी, रेल्वे स्थानकांवरील ही चार्जिंग सुविधा परवडणारी, कार्यक्षम आणि विश्वासार्ह असेल. येत्या काही वर्षांत १०० टक्के विद्युतीकरण, विजेचा कमीतकमी वापर, सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जेच्या निर्मितीद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणे यासारख्या भारतीय रेल्वेने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या पुढाकारांमध्ये ईव्ही चार्जिंग पॉईंट्सच्या तरतुदी हे आणखी एक ‘हरित उपक्रम’ पाऊल आहे.