कारला नवा उजाळा, नवा लूक देणारी ग्राफिक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 05:00 PM2017-10-09T17:00:00+5:302017-10-09T17:00:00+5:30
कारला ग्राफिक्सद्वारे सजवून केवळ प्लॅस्टिक वा विनिएलच्या सहाय्याने स्टिकर्ससारख्या आगळ्या वेगळ्या प्रकाराने वेगळा लूक देता येतो. सौदर्याच्या वेगळा वाढीबरोबर, नजरेबरोबर व्यावसायिक जािहरातही या ग्राफिक्सद्वारे केली जाते
सध्या ग्राफिक्सचा एक आगळा जमाना आहे. विविध प्रकारच्या चित्रांनी, आरेखनांनी, रंग-रेषांच्या माध्यमातून कारवर वेगळीच कलाकारी केली जाते आणि त्यामुळे कारचा लूक एकदमच बदलून टाकला जातो. विनिएल वापरून तर कधी प्लॅस्टिकचे स्टिकर्स वापरून तयार केलेल्या एका वेगळ्याच रचनेने कारला स्वतंत्र असे रूप देता येते. याच ग्राफिक्सच्या माध्यमातून केवळ रंग रूप नव्हे तर एखादा संदेश, कंपनीची जाहिरात, स्वतःच्या वेगळ्या कल्पनांचाही अविष्कार करता येतो.
परदेशात अगदी हौशीने कारला सजवणारेही लोक आहेत. भारतातही हा प्रकार आता बऱ्यापैकी दिसू लागला आहे. अर्थात तसे प्रमाण खूप कमी आहे. या कामामध्ये असलेले कलाकार हे कसे रूप देतात, काय विचार करून कारचा चेहरामोहरा बदलतात त्यावरही बरेच काही असते. तशी ही कला भारतात अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या सुधारित श्रेणीसाठी वा वरच्या श्रेणीसाठी वापरलेली दिसते.
कारला डाव्या, उजव्या बाजूला अर्ध्या उंचीवर वा कधी काहीशा छोट्या आकारातही काही ग्राफिक्सचा वापर केला जातो. कारच्या मागील दरवाज्यावरही त्याचा वापर केला जातो. तयार स्टिकर्स वा ग्राफिक्स मिळत असतात. त्यात विविध प्रकारची चित्रे, प्राण्यांचे, खेळाच्या साधनांचे ग्राफिक्स तयार रूपात मिळतात. उपयुक्त सेवेतील संस्थाही आपल्या वाहनावर आपला पत्ता, मोबाइल फोन, सेवेची माहिती यासाठी आज रंगाएेवजी प्लॅस्टिक स्टिकर्सचा वापर करतात, एकूणच कारवर रंगाचा वापर करण्याऐवजी दीर्घकाळ टिकणारे वा आतील मूळ रंग खराब न करणारे हे ग्राफिक्स वा स्टिकर्स आज कारची एक वेगळी ओळखही झालेली आहे.
कारच्या मूळ रंगाला साजेल असे आरेखन निवडता येते व ते कारच्या बाह्य भागावर तुम्हाला हवे त्या प्रकारचे निवडताही येते. यामुळे तुमच्या कारला वेगळे सौदर्य प्राप्त होते. तर एकाच रंगाच्या कारमध्ये अन्य रंगांची सुयोग्य व रेखीव उधळणही करता येते. सौदर्य, मार्केटिंग, आगळेपणा, विविधता अशा या हेतूंनी कारला सजवण्याचा हा एक चांगला उपाय आहे. अर्थातच हा प्रत्येक कारमालकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीचाही भाग असल्याने कंपनीने दिलेल्या ग्राफिक्सखेरीज अन्य आपल्या आवडीनिवडीप्रमाणे ग्राफिक्स निवडून त्याचा वापर करणारे हौशी तसे कमीच आहेत.