TVS, Bajaj, Honda ला धोबीपछाड! ‘ही’ कंपनी ठरलीय नंबर १; किती टू व्हीलर्स विकल्या? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:26 PM2021-12-01T15:26:58+5:302021-12-01T15:27:42+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ८.६ टक्क्यांची घट झाली असली, तरी कंपनी पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.
नवी दिल्ली: कोरोना संकटातून आता हळूहळू उद्योग सावरताना दिसत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातही चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्ससह कंपन्या आपली नवनवीन उत्पादने भारतीय बाजारात सादर करत आहेत. यातच आता गेल्या सुमारे सात महिन्याच्या कालावधीत स्वदेशी कंपनीने भारतीय बाजारपेठेत होंडा, टीव्हीएस, बजाज, सुझुकी, यामहा यांसारख्या कंपन्यांना मागे टाकत टू व्हिलर मार्केटच्या विक्रीत क्रमांक एकची कंपनी बनल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या सात महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीनुसार, हीरो मोटोकॉर्प कंपनीने २८,३४,२९३ दुचाकींची विक्री केली. तर, या तुलनेत कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात ३१,०३,७८७ युनिट्सची विक्री केली होती. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत हीरोच्या एकूण विक्रीमध्ये ८.६ टक्क्यांची घट झाली असली तरी कंपनी पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर होंडा, तर टीव्हीएस तिसऱ्या स्थानी
दुसऱ्या क्रमांकावर होंडा असून, या कंपनीच्या एकूण २०,९१,५६७ बाईक्सची विक्री केली. होंडाच्या विक्रीमध्ये ५.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. टॉप १० बेस्ट सेलिंग टू व्हीलर ब्रँड्समध्ये हिरो आणि रॉयल एनफिल्ड वगळता अन्य कंपन्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच टीव्हीएसच्या विक्रीत ४.३ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. टीव्हीएसने ११,८६,९१२ टू व्हीलरची विक्री केली आहे. यानंतर बजाजने १०,२९,४३८, सुझुकीने ३,५१,६५७ आणि यामाहाने २,८०,८८३ टू व्हीलर्सची विक्री केली आहे.
दरम्यान, रॉयल एनफील्डने २,५०,८८१ टू व्हीलरची विक्री केली आहे. तर, Piaggio ने ३०,७२४, कावासाकीने २,१७७ आणि Triumph ने ७०२ टू व्हीलर्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे Piaggio च्या विक्रीत २१.५ टक्के, कावासाकीच्या विक्रीत ३००.९ टक्के, तर Triumph च्या विक्रीत ७४.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.