नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे असलेला भारतीयांचा कल वाढताना दिसत आहे. कार असो वा स्कूटर असो इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाहनांची विक्री वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात अनेक मोठ्या दुचाकी कंपन्या भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक लाँच करणार आहेत. लवकरच जपानची दिग्गज होंडा देखील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर Activa असू शकते, असे सांगितले जात आहे.
भारतात सर्वाधिक विक्री होणारी Honda Activa आता नवीन इलेक्ट्रिक रुपात म्हणजे Honda Activa Electric म्हणून लाँच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता भारतामध्ये होंडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंगलाही सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे.
होंडा २०२४ पर्यंत ३ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार
Honda मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया पुढील वर्षी भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडेच होंडाची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर BENLY इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय रस्त्यांवर दिसली होती. मात्र, बॅटरी आणि रेंजची टेस्टिंग झाल्यानंतर कंपनी आपली बेस्ट सेलिंग एक्टिवा स्कूटरलाच Honda Activa EV स्वरुपात सादर करण्याचीही दाट शक्यता आहे, अशी चर्चा आहे. आताच्या घडीला होंडा कंपनी इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजाराचे मूल्यांकन करत आहे. होंडा कंपनी २०२४ पर्यंत जागतिक स्तरावर किमान ३ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. मात्र, यापैकी किती मॉडल्स भारतात लाँच होतील, याबाबत अधिक स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात TVS iQube ने बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा एकदा मागे टाकले आहे. सप्टेंबर महिन्यात बजाज ऑटोने आपल्या एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर चेतकच्या ६४२ युनिट्सची विक्री केली आहे. तर, TVS Motors ने या महिन्यात iCube च्या एकूण ७६६ युनिट्सची विक्री केली आहे.