नवी दिल्ली : ह्युंदाईला भारतात स्थिरस्थावर करणारी सँट्रो या कारची नवी कार्बन कॉपी भारतात पुन्हा लाँच करण्यात आली असून सुरुवातीची किंमत 3.89 लाख रुपयांपासून ठेवण्यात आली आहे. तर ह्युंदाईने या कारचे पाच व्हेरिअंट आणले आहेत ज्यामध्ये इंधन दरवाढीपासून दिलासा देणारा सीएनजी पर्यायही देण्यात आला आहे.
ह्युंदाईने आज बहुचर्चित सँट्रो कार लाँच केली. या कारचे Dlite, Era, Magna, Sportz आणि Asta असे पाच व्हेरिअंट लाँच केले. यामध्ये Magna आणि Sportz व्हेरिअंटमध्येच सीएनजीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे सीएनजी फॅक्टरी फिटेड असणार आहे. तसेच ड्रायव्हर एअरबॅग आणि एबीएस सर्व व्हेरिअंटमध्ये देण्यात आले आहे.
नव्या सँट्रोमध्ये 1.1 लीटरचे 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 69 पीएस ताकद आणि 99 एनएम टॉर्क उत्पन्न करते. तर सीएनजी व्हेरिअंट 58 बीएचपी ताकद आणि 84 एनएम टॉर्क उत्पन्न करते. याचबरोबर 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मॅग्ना आणि स्पोर्ट व्हेरिअंटमध्ये 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स मिळणार आहे. मात्र, सीएनजीसाठी केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन असणार आहे. पेट्रोलवर मॅन्युअल आणि अॅटो ट्रान्समिशनसाठी 20.3 किमी चे मायलेज तर सीएनजीसाठी 30.5 किमी प्रतिकिलोचे मायलेज मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. कारचा सर्वाधिक वेग 150 किमी प्रति तास आहे.
सात रंगात सँट्रो कार सात रंगांमध्ये उपलब्ध झाली आहे. सिल्वर, पोलार वाइट, स्टारडस्ट (डार्क ग्रे), इम्पीरियल बेज, मरीना ब्लू, फियरी रेड आणि डायना ग्रीन हे रंग आहेत. पुढील बाजुला क्रोम फिनिश कॅस्केडिंग ग्रील आणि पाठीमागे ड्युअल टोन बंपर देण्यात आला आहे.
तसेच 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो आणि मिरर लिंक सारखे फिचर देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे मागे बसणाऱ्यांसाठी रिअर एसी व्हेंटही देण्यात आला आहे. पार्किंगसाठी रिअर पार्किंग कॅमेराही देण्यात आला आहे. कीलेस एन्ट्रीचीही सुविधा आहे.
पहिल्या 50 हजार ग्राहकांसाठी पर्वणी कंपनीने पहिल्या 50 हजार ग्राहकांसाठी खास सवलतीमध्ये किंमत आकारणार आहे. Dlite ची किंमत 3.89 लाख, Era 4.24 लाख, Magna 4.57 लाख, Sportz4.99 लाख आणि Asta ची किंमत 5.45 लाख रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे. तर सीएनजी Magna 5.23 लाख आणि Sportz 5.64 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या किंमती भारतभर समान राहणार आहेत.