नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी ह्युंदाई आपल्या कारच्या किंमती 30 हजार रुपयांपर्यंत वाढविणार आहे. यामुळे कमी किंमतीमध्ये आणि वर्षसमाप्तीच्या ऑफरवर कार खरेदी करण्याचा शेवटचे 10 दिवस उरले आहेत. कंपनीचा उत्पादनखर्च वाढल्याने ही वाढ करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे टाटा, महिंद्रासह अन्य कार कंपन्याही दरवाढ करणार आहेत.
ह्युंदाई मोटर्सने ही माहिती दिली आहे. ह्युंदाईच्या सर्व मॉडेल्सचे दर 30 हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. कंपनी 3.89 लाख रुपयांपासून 26.84 लाख रुपयांपर्यंत किंमतीच्या कार भारतात विकते. यामध्ये सँट्रोपासून टक्सन या कारचाही समावेश आहे.
गेल्या आठवड्यातच टाटा मोटर्स, फोर्ड इंडिया, निसान, मारुती सुझुकी या कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली होती. शिवाय टोयोटा, बीएमडब्ल्यू, रेनॉल्ट आणि इसुझुही आपल्या कारच्या किंमती वाढविणार आहे.
काय आहे संधी?नवीन कार घ्यायची असल्यास उत्सव काळ किंवा वर्षसमाप्तीचा काळ उत्तम असतो. कारण या काळात कंपन्या डिस्काऊंट जाहीर करतात. साधारणत: कंपन्या 1 जानेवारी किंवा सहा महिन्यांमध्ये दर वाढवतात. यामुळे वाढणारे दर आणि वर्ष संपण्याचा डिस्काऊंट असे गणित पकडल्यास लाखभर रुपये वाचतात. यामुळे कमी बजेट असलेल्यांनाही याचा फायदा मिळतो. त्यांना बजेटमध्ये नसणारी कारही या काळात खरेदी करता येते.