पगार १ लाखाहून कमी असेल तर नवीन कार खरेदी करायची की जुनी?; समजून घ्या गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:05 AM2022-08-30T11:05:24+5:302022-08-30T11:09:42+5:30
जर तुम्ही एखाद्या मेट्रो शहरात राहत असाल तर सहजपणे तुम्हाला कॅब सुविधा मिळू शकते. परंतु कार घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या बजेटनुसार त्याचं प्लॅनिंग करा.
मुंबई - आजच्या काळात बे'कार' कुणाला राहू वाटत नाही. काही लोकांची गरज असते तर काही स्टेटस राखण्यासाठी कार खरेदी करतात. ज्यांच्याकडे पैशाची कमी नाही ते वेगवेगळ्या कार खरेदी करण्याचा छंद जोपासतात. कार खरेदी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग ती कार खरेदी कधी करायची? त्यासाठी तुमचा पगार किती हवा? कुठल्या किंमतीची कार खरेदी करायला हवी? याबाबत आपण जाणून घेऊया.
कार खरेदी कधी करायची?
जर तुम्ही एखाद्या मेट्रो शहरात राहत असाल तर सहजपणे तुम्हाला कॅब सुविधा मिळू शकते. परंतु कार घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या बजेटनुसार त्याचं प्लॅनिंग करा. अनेकजण विनाप्लॅन कार खरेदी करतात त्यानंतर EMI भरताना त्यांच्या नाकीनऊ येते. कारचा ईएमआय एकूण सॅलरीच्या ७ ते १० टक्के असायला हवा कारण पगाराचा मोठा भाग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि बचत यासाठी असतो. अर्थगणितानुसार, एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त १० टक्के भाग कारच्या EMI साठी खर्च करू शकतात.
उदाहरण समजा, एका मध्यमवर्गीय कुटुंबाला कार खरेदी करायची असेल तर ती जवळपास ७ लाखांपर्यंत असते. ही मारुतीची WagonR, TATA Punch, Hyundai i10 होऊ शकते. नेहमी ग्राहक कार खरेदी करताना १ लाख रुपये डाऊनपेमेंट देतात. बाकी ६ लाख ईएमआय भरण्यासाठी तयार असतात. कार लोन हे ५-७ वर्षांसाठी असते. आपण ५ वर्षाचा कालावधी ग्राह्य धरू. सध्या कार लोनवर ८ टक्के व्याजदर आहे. अशावेळी ६ लाखांच्या कर्जासाठी ८.५० टक्के व्याजाने ५ वर्षासाठी ईएमआय १४३६२ रुपये असेल. म्हणजे दरमहिन्याला १४३६२ रुपये EMI भरावा लागेल. त्याप्रमाणे ५ वर्षात ग्राहकाला एकूण ८ लाख ६१ हजार ६९४ रुपये भरावे लागतील. ज्यात व्याजाचा भाग १ लाख ६१ हजार ६९४ इतका असेल.
आता मुद्द्याची गोष्ट म्हणजे, दरमहिन्याला १४३६२ रुपये ईएमआय भरण्यासाठी तुमची सॅलरी कमीत कमी १ लाख रुपये महिना असायला हवी. कारण सॅलरीचा ७-१० टक्के भाग कारच्या ईएमआयसाठी वापरावा लागेल. जर सॅलरी १ लाखाहून कमी असेल तर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याऐवजी ३-४ वर्ष जुनी कार खरेदी करू शकता. जी तुम्हाला ३ लाखापर्यंत मिळू शकते. म्हणजे तुम्ही १ लाख डाऊनपेमेंट केल्यास ५ वर्ष तुम्हाला ४ हजार १५२ रुपये EMI भरावा लागेल.
जुनी कार
कारची किंमत - ३ लाख रुपये
डाऊनपेमेंट - १ लाख रुपये
कर्ज - २ लाख रुपये
कालावधी - ५ वर्ष
व्याजदर - ९ टक्के वार्षिक
EMI - ४ हजार १५२ रुपये
एकूण पेमेंट - १ लाख + २ लाख ४९ हजार १०० रुपये = ३ लाख ४९ हजार १०० रुपये
नवीन कार आणि जुनी कार यांच्यात ६ लाख १२ हजार ५९४ रुपये तफावत आहे. कार खरेदी करतानाचा डाऊनपेमेंट समान आहे. परंतु EMI मध्ये खूप फरक आहे. त्यामुळे कार खरेदी करताना तुमच्या पैशांची बचत कशी होईल. दर महिन्याला EMI भरण्याचा ताण कितपत झेपेल? याचा विचार करून चारचाकीचं स्वप्न पूर्ण करा.