बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस आरटीओच्या रडारवर; २,३८१ वाहनांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 05:33 AM2019-12-13T05:33:56+5:302019-12-13T06:06:45+5:30
राज्यभरातून ३८ लाखांची दंडवसुली
मुंबई : राज्यात अनधिकृत स्कूल बसेसवर कारवाईसाठी आरटीओकडून २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत दोषी आढळलेल्या २,३८१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ३८ लाखांची दंडवसुली केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिली.
विशेष मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया दुचाकीसह स्कूल बस, रिक्षा यांची तपासणी करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक आणि चालक, सहप्रवासी, विद्यार्थी यांनी हेल्मेट न घालणे, भाडे नाकारणे आदी कारणांसाठी तपासणीअंती दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेंतर्गत ५ हजार २६५ स्कूल बसेस तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ४ हजार ३६६ अवैध वाहने अशी राज्यभरातील एकूण ९ हजार ६३१ वाहने तपासण्यात आली. ज्यात १ हजार १८० स्कूल बसेस दोषी आढळून आल्या, तर १ हजार २०१ अवैध वाहनांनीसुद्धा आरटीओ नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आले.अशा प्रकारे राज्यातील एकूण २,३८१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. दोषींकडून ३८,००,८२४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
४८७ बसेसवर जप्तीची कारवाई
विशेष मोहिमेंतर्गत अधिकृत परवाना धारकांकडूनही स्कूल बसच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन होते का, याची तपासणी करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाºया एकूण ४८७ स्कूल बसेसवर तपासणीअंती जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.