नवी दिल्ली : व्हील्स ऑफ चेंज अंतर्गत अमेरिकेची पहिली मोटरसायकल कंपनी इंडियन मोटरसायकलने एक खास मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी Indian Motorcycle Golden Quadrilateral या भारत भ्रमंतीच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेमध्ये 12 सदस्य सहभागी झाले असून 15 शहरांना भेटी देणार आहेत. हे अंतर 8000 किमी एवढे आहे. याकाळात ते मुलींना शिकविण्य़ासाठी लोकांमध्ये जागृती करणार आहेत. याशिवाय मुलींमध्ये जाऊन शैक्षणिक साहित्यही वाटणार आहेत.
ही मोहीम 26 सप्टेंबरपासून सुरु झाली असून 14 ऑक्टोंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या काळात हे पथक गुरुग्राम, जयपूर, जैसलमेर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, हुबळी, बंगळूरू, चेन्नई, विजयवाडा, भुवनेश्वर, कोलकाता, औरंगाबाद आणि लखनऊ या शहरांना भेटी देून पुन्हा दिल्लीला येणार आहे.
या मोहिमेला हिरवा झेंडा दाखविताना Polaris India चे प्रमुख आणि व्यवस्थापकिय संचालक पंकज दुबे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मुलींना साक्षर बनविणे समाजासाठी चांगले आहे. आम्ही याला पूर्ण समर्थन देत असून ही बाब घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू.