Honda Cityची पेट्रोल आवृत्तीतील BS6 रुपातील नवी गाडी लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 10:06 PM2019-12-12T22:06:15+5:302019-12-12T22:06:42+5:30
होंडा कार्स इंडिया लिमिटेड(HCIL)नं Honda Cityची पेट्रोल आवृत्तीतील BS6 रुपातील नवी गाडी लाँच केली आहे.
नवी दिल्लीः होंडा कार्स इंडिया लिमिटेड(HCIL)नं Honda Cityची पेट्रोल आवृत्तीतील BS6 रुपातील नवी गाडी लाँच केली आहे. सेडान प्रकारातील BS6 इंजिनच्या या होंडा सिटीच्या पेट्रोल आवृत्तीतील गाडीची किंमत 9.91 लाखांपासून 14.31 लाख रुपयांपर्यंत आहे. BS6 इंजिनयुक्त असलेल्या होंडा सिटीच्या पेट्रोल आवृत्तीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. होंडा सिटीचं लवकरच अपग्रेडेड डिझेल व्हेरियंट लाँच करण्यात येणार आहे. मिड-साइज सेडान प्रकारात BS6च्या इंजिनाबरोबर बाजारात आलेली होंडा सिटी ही पहिली कार ठरली आहे.
नव्या होंडा सिटीमध्ये 1.5 लीटर, 4 सिलिंडर, वॉटर कूल्ड, SOHC, i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आलेलं आहे. या इंजिनमुळे 119 PSची पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण होणार आहे. तसेच या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची व्यवस्थाही आहे. नव्या होंडा सिटीमध्ये आपल्याला CVT पर्यायही मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार मॅन्युअल प्रकारात ही गाडी 17.4 किलोमीटर प्रतिलिटर सरासरी अंतर कापणार आहे. होंडा सिटीनं BS6 प्रकारातील गाडी बाजारात आणल्यानं कंपनीच्या आता या आवृत्तीतील तीन गाड्या झाल्या आहेत. होंडा CR-V पेट्रोल, होंडा सिव्हिक पेट्रोल आणि Honda Cityची BS6 इंजिनही गाडीही आता बाजारात आहे. भारतात नव्या होंडा सिटीची प्रतिस्पर्धा मारुती सुझुकी सियाज, ह्युंदाई वर्ना, फॉक्सवेगन वेंटो आणि स्कोडा रॅपिडसारख्या गाड्यांबरोबर आहे.
कंपनीनं नव्या होंडा सिटीत V, VX आणि ZX प्रकारात अद्ययावत इन्फोटेन्मेंट सिस्टम Digipad 2.0सुद्धा दिलेलं आहे. ज्यात 17.7cm अत्याधुनिक टचस्क्रीन ऑडिओ, व्हिडीओ आणि नेव्हिगेशन सिस्टम आहे. ऍपल कार प्ले आणि ऍड्रॉइड ऑटोच्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसुद्धा दिलेली आहे. तसेच इन-बिल्ट सेटलाइट-लिंक्ड, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, USB वाय-फाय रिसिव्हरच्या माध्यमातून लाइव्ह ट्रॅफिक सपोर्ट, वॉयस कमांडसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.