ती पुन्हा येतेय! LML तीन ईलेक्ट्रीक स्कूटर उतरवणार; हार्ले डेव्हिडसनची कंपनी उत्पादन घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:51 AM2022-08-31T11:51:20+5:302022-08-31T11:51:38+5:30
LML Electric Scooter to launch: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांबाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत या उत्पादनाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दुचाकी बाजारात बंद पडलेली एलएमएल कंपनी पुन्हा मोठ्या जोशात उतरणार आहे. पुढील महिन्यात कंपनी गोल्डन ज्युबली साजरा करणार आहे. या दिवशी तीन इलेक्ट्रीक स्कूटर सादर करणार आहे. हा जागतिक स्तरावरील कार्यक्रम आहे. यामुळे एलएमएल मोठ्या ताकदीनिशी पुन्हा भारतीय बाजारात उतरण्याचे हे संकेत आहेत.
कंपनी या कार्यक्रमात आगामी इलेक्ट्रिक मॉडेल्सची माहिती देईल. यामध्ये वैशिष्ट्ये, डिझाइन, तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि इतर माहिती असेल. तीन दुचाकी मॉडेल्सच्या संकल्पना मांडण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यानंतर या वाहनांची टेस्टिंग करून त्या बाजारात आणणार येणार आहेत.
हळुहळू जगभरातील एलएमएल रिटर्नची तारीख जवळ येत असल्याने आम्हाला आनंद होत आहे. आमच्या पहिल्या 3 इलेक्ट्रिक वाहनांच्या संकल्पनेचे अनावरण 29 सप्टेंबर रोजी केले जाईल. आजच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात आम्ही कसा बदल करू शकतो हे देखील दाखवू, असे एलएमएल इलेक्ट्रिकचे एमडी आणि सीईओ डॉ. योगेश भाटिया यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांबाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत या उत्पादनाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच सिएरा इलेक्ट्रिकसोबत करार केला होता. हीच कंपनी भारतात हार्ले डेव्हिडसनसाठी मोटारसायकल बनवते. सिएरा इलेक्ट्रिक LML च्या इलेक्ट्रिक दुचाकी देखील तयार करेल असा अंदाज आहे. सिएरा हरियाणातील बावल येथील त्यांच्या अत्याधुनिक प्लांटमध्ये LML साठी इलेक्ट्रिक वाहने तयार करू शकते.