लक्झरी क्रॉसओव्हरच्या शोधात आहात? जरा थांबा...रेनॉल्टची Arkana येतेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 08:49 PM2018-08-29T20:49:19+5:302018-08-29T20:50:04+5:30
लक्झरी क्रॉसओव्हर कारच्या शोधात असाल तर काही दिवस थांबा. टाटाची हॅरिअर, मारुतीची फ्युचर एस काही महिन्यांत भारतात लाँच होईलच परंतू रेनॉल्टची हा कार पाहून तुम्हाला घ्यावीशीच वाटेल. रेनॉल्टने बीएमडब्ल्यू x6 च्या धर्तीवर एक लक्झरी कार आज मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय ऑटो शो मध्ये लाँच केली. ही कार Mercedes-Benz GLE Coupe या कारलाही टक्कर देणारी आहे.
रेनॉल्टने गेल्या वर्षीच एक मध्यम आकाराची एसयुव्ही कार कॅप्टर लाँच केली होती. आता त्यावर अर्काना ही लक्झरी क्रॉसओव्हर आणली आहे. ही कार महिंद्राने 2016 मध्ये भारतीय ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या Aero सारखी दिसते. परंतू ही कार पाहिल्यास बीएमडब्ल्यूची भारतातील x4 आणि Mercedes-Benz GLE Coupe यांना कमी किंमतीत थेट टक्कर देणार आहे.
रेनॉल्टने सांगितले की, ही अर्काना कार नव्या एसयुव्ही प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. तसेच ही जीप कंपासपेक्षा लांबीला जास्त आहे. यामुळे या कारचा व्हीलबेसही लांब आहे.
अर्कानाची अंतर्गत रचनाही मर्सिडिस, बीएमडब्ल्यू सारखी आकर्षक आहे. कंपनीने ही कार सेदान पेक्षा वरच्या श्रेणीचा विचार करणाऱ्या लोकांना गृहीत धरून बनविली आहे. पॅनारोमिक ग्लास रुफ, 19 इंचाची मोठी चाके आणि दणकटपणा या कारला रस्त्यावर विश्वास देतात.
रेनॉल्ट-मित्सुबिशी आणि मर्सिडिस यांनी एकत्रित तयार केलेले इंजिन या कारमध्ये वापरण्यात येणार आहे. 1.3 लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन 160 पीएसची ताकद आणि 260 न्युटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. अर्काना ही एसयुव्ही 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ड्युअल क्लच अॅटोमॅटीक मध्येही मिळणार आहे. तसेच बीएस- 6 या इमिशन नॉर्म 2020 लागू होण्याच्या पार्श्वभुमीवर 1.5 लीटर ब्ल्यू डीसीआय मोटर वापरण्यात येणार आहे. ही दोन्ही इंजिन पूर्णत: नवीन आहेत. युरोपमध्ये सध्या हे डिझेल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि अॅटोमॅटीकमध्ये उपलब्ध आहे.
रशियामध्ये यावर्षी अर्कानाचा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. तसेच विक्री पुढील वर्षीपासून करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले.