मारुतीनं परत मागवल्या ६० हजार कार; जाणून घ्या का आणि कोणत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 06:34 PM2019-12-06T18:34:43+5:302019-12-06T18:45:15+5:30
सियाज, एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल आवृत्तीतील ज्या गाड्या परत मागवण्यात आलेल्या आहेत
नवी दिल्लीः देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या मारुती सुझुकीनं शुक्रवारी 60 हजारांहून अधिक वाहनं परत मागवली आहेत. मारुतीनं स्वतःची सियाज (Ciaz), एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल स्मार्ट हायब्रिड (SHVS) व्हेरियंट्सच्या 63,493 गाड्या परत मागवल्या आहेत. परत मागवण्यात आलेल्या काही वाहनांच्या पार्टमध्ये तांत्रिक दोष आढळून आला आहे. सियाज, एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल आवृत्तीतील ज्या गाड्या परत मागवण्यात आलेल्या आहेत, त्या वाहनांची निर्मिती 1 जानेवारी 2019 ते 21 नोव्हेंबर 2019मध्ये झालेली आहे. या गाड्यांच्या मोटर जेनरेटर युनिट(MGU)मधील दोष दूर करण्यासाठी मारुती पुन्हा या वाहनांची तपासणी करणार आहे.
वाहनातला खराब पार्ट्स मोफत दिला जाणार बदलून
मोटर जेनरेटर युनिट्स(MGU)मध्ये असलेला तांत्रिक दोष हा एका ओवरसीज ग्लोबल पार्ट सप्लायरद्वारे निर्मित करताना आला आहे. या गाड्या परत मागवण्याचा घटनाक्रम 6 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. ही वाहनं परत मागवत असल्यानं ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत, त्या संबंधित गाडी मालकांशी कंपनीचे डिलर्स संपर्क साधणार आहेत. जर गाडीतला प्रभावित पार्ट्स बदलण्यासाठी गाडी सर्व्हिस सेंटरमध्येच ठेवावी लागल्यास डिलर्स गाडी मालकांना इतर पर्याय उपलब्ध करून देण्याची ऑफर देतील. तसेच हा निकृष्ट दर्जाचा वाहनातील भाग मोफत बदलून दिला जाणार आहे.
ऑगस्टमध्ये मागवल्या होत्या 40,618 WagonR
मारुतीनं ग्राहकांचं हित लक्षात घेता या गाड्या परत मागवलेल्या आहेत. तपासणीत ज्या गाड्यांमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही, त्या तात्काळ मालकांना देण्यात येणार आहेत. तसेच ज्या गाड्यांच्या पार्टमध्ये दोष आढळलेला आहे, त्या गाड्यांमधले पार्ट मोफत बदलले जाणार आहेत. कंपनीनं ऑगस्टमध्येही 40,618 WagonR (1.0 लीटर) परत मागवल्या होत्या. मारुती XL6 आणि एर्टिगाची सरासरी मासिक विक्री 4,200 युनिट्स ते 7,000 युनिट्सच्या जवळपास आहेत. दुसरीकडे मारुती सियाजच्या विक्रीत घसरण होत चालली आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनीनं सियाजच्या 1,148 गाड्या परत मागवलेल्या होत्या. सियाजच्या विक्रीत 62 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.