मारुती आणणार मोठ्ठी एसयुव्ही; हेक्टर, क्रेटा, सेल्टॉसला टक्कर देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:49 PM2019-11-06T16:49:02+5:302019-11-06T16:51:35+5:30
मारुतीने नुकतीच एक्सएल 6 ही सात सीटर प्रिमिअम कार लाँच केली होती. अन्य कंपन्यांच्या छोट्या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीने एस प्रेसो ही कारही लाँच केली होती.
नवी दिल्ली : मारुतीने नुकतीच अल्टोच्या रेंजमध्ये मिनी एसयुव्ही S-Presso लाँच केली आहे. आता मारुती ह्युंदाईच्या क्रेटा आणि कियाच्या सेल्टॉसला टक्कर देणार आहे. जुन्या कार विकून नवीन कार घेणाऱ्या ग्राहकांना नजरेसमोर ठेवून मारुती मोठा डाव खेळत आहे. मारुती आता 20 लाख रुपयांच्या रेंजमध्ये नवीन एसयुव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
मारुतीने नुकतीच एक्सएल 6 ही सात सीटर प्रिमिअम कार लाँच केली होती. अन्य कंपन्यांच्या छोट्या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीने एस प्रेसो ही कारही लाँच केली होती. मारुतीने एन्ट्री लेव्हल, सेदान ते क्रॉसओव्हर कारपर्यंतच्या सर्व श्रेणींमध्ये कार उतरविल्या आहेत. उलट अन्य कंपन्यांच्या तुलनेत मारुतीकडे वेगवेगळी मॉडेल आणि श्रेणीच्या कार आहेत. सध्या बाजारात बदलाचे वारे आहेत. नव्याने लाँच केलेल्या कारना मोठी मागणी आहे. किया सेल्टॉस, एमजी हेक्टर या कारना मोठी मागणी आहे.
गेल्या काही महिन्यांत कियाने 60 हजारांचे बुकिंग मिळविले आहेत. तर एमजीने 38 हजारांचा आकडा पार केला आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही नव्या कंपन्या आहेत. यावरूनच दिसते की भारतीय ग्राहकांना आता बदल, काहीतरी नवे हवे आहे. बाजारात मंदी असतानाही ग्राहकांनी या नव्या श्रेणीच्या कारना पसंती दाखविली आहे. यामुळे मारुतीनेही या प्रिमियम श्रेणीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात एसयुव्ही आणि एमपीव्ही कारना मोठी मागणी राहणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार कंपनी 20 लाखांच्या रेंजची कार बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. या नव्या एसयुव्हीची लांबी 4.3 मीटर असेल, मात्र पेट्रोल इंजिन 1.2 लीटरचेच असेल. तर डिझेलचे इंजिन 1.5 लीटरचे असेल. ही एसयुव्ही 2022 पर्यंत बाजारात येईल. टोयोटाची मदत यासाठी घेतली जात आहे. तसेच एक्सएल 6 च्या वर आणखी एक कार आणण्याची तयारी कंपनीने केली आहे.