MG मोटर भारतात करणार 3000 कोटींची गुंतवणूक; लवकरच येणार नव्या गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:39 PM2019-12-16T16:39:29+5:302019-12-16T16:40:51+5:30
दिग्गज वाहन कंपनी असलेली मॉरिस गॅरेज (MG) भारतात जवळपास 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
नवी दिल्लीः दिग्गज वाहन कंपनी असलेली मॉरिस गॅरेज (MG) भारतात जवळपास 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. मूळ ब्रिटनची असलेल्या कंपनीचं सर्वाधिकार आता चीनच्या एसएआयसीजवळ आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतात कंपनीनं 2 हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. कंपनीचा हलोल (गुजरात)मध्ये कारखाना सुरू करण्यात आला आहे.
एमजी मोटर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी गौरव गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही भारताच्या बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहोत. जानेवारीत आम्ही भारतातल्या प्रवासाला सुरुवात केली. देशासाठी आमची योजना दीर्घकालीन आहे. आम्ही 3 हजार कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक करणार आहोत. कंपनीनं आतापर्यंत भारतात जवळपास 13000 एमजी हेक्टर गाड्यांची विक्री केली आहे. एमजी मोटार इंडियानं नोव्हेंबर महिन्यात हेक्टरच्या 3239 गाड्यांच्या विक्री केल्या आहेत. कंपनी लवकरच एक इलेक्ट्रिक स्पोर्ट्स युटिलिटी गाडीही सादर करणार आहे. जुलै 2021पर्यंत आमच्याजवळ चार मॉडल असतील. सर्वच वाहनं एसयूव्ही प्रकारातील असणार आहे.
एमजी मोटर स्वतःची इलेक्ट्रिक SUV ZS पुढच्या वर्षी जानेवारीत लाँच करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक SUVची किंमत 22-25 लाख रुपयांच्या आसपास राहणार आहे. एमजी मोटरची इलेक्ट्रिक एसयूव्ही ZSमध्ये 44.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 340 किलोमीटर अंतर कापणार आहे. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक कारची विक्री दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादेत करणार आहे. कंपनी सुरुवातीला दर महिन्याला इलेक्ट्रिक एसयूव्हीचे 100 युनिट्स तयार करणार आहे. मागणीच्या आधारावर याचं महिन्याकाठीचं उत्पादन वाढवून 200-300 युनिट करण्यात येणार आहे. सध्या एमजी मोटर इंडिया हेक्टर एसयूव्हीच्या 6-सीटर आवृत्तीवर काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या कारचं मॉडल एमजी मोटारच्या कारखान्यात पाहायला मिळालं होतं. 6-सीटर एमजी हेक्टरची किंमत 5-सीटर आवृत्तीपेक्षा एक लाख रुपयांनी जास्त राहणार आहे.