मुंबई : ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजीने सहा महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. भारतातील पहिली इंटरनेट कार लाँच केल्याने वाहन क्षेत्रात खळबळ उडाली होती. मंदीचा काळ असतानाही एमजीच्या हेक्टर एसयुव्हीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आज कंपनीने या कारची इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच केली आहे.
भारतीय वाहन क्षेत्र हळूहळू इलेक्ट्रीक वाहनांकडे वळू लागले आहे. यामुळे सर्वच कंपन्या येत्या काळात इलेक्ट्रीक वाहने लाँच करणार आहेत. निस्सान, टाटा, मारुती या कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार लाँच केल्या आहेत. या पंक्तीमध्ये आता एमजीचेही नाव आले आहे.
एमजीने भारतातील पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही लाँच केली आहे. MG ZS EV असे या कारचे नाव असून जानेवारीमध्ये या कारच्या किंमती जाहीर केल्या जाणार आहेत. ही कार ह्युंदाईच्या कोनाला टक्कर देणार आहे. महत्वाचे म्हणजे या कारची एकदा चार्ज केल्याची रेंज 340 किमी असणार आहे.
ही इलेक्ट्रीक कार 8 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रतीतास वेगाने धावते. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी IP67 सर्टिफाइड आहे. यावर पाणी आणि धुळीचा परिणाम होत नाही.
MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 50 kW DC चार्जर देण्यात आला आहे. यामुळे ही कार 40 मिनिटांतच 80 टक्के चार्ज होते. तर 7.4 kW च्या चार्जरने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास 7 तास लागतात.