अरे बापरे...! कारचे स्वप्न आणखी महागणार... मारुतीही किंमत वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:08 PM2018-08-17T13:08:11+5:302018-08-17T13:09:50+5:30
कच्चा माल, वाहतूक खर्च, इंधन आणि परकीय चलनातील वाढ कारणीभूत
नवी दिल्ली : कार निर्मितीमध्ये सर्वांत मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा माल, वाहतूक खर्च, इंधन आणि परकीय चलनातील वाढ यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहेत. यामुळे कंपनीने गुरुवारी आपल्या सर्व कारवर 6,100 रुपयांपर्यंत किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती- सुझुकीच्या कारची वाढलेली किंमत ही आजपासून एक्स-शोरुम लागू होणार आहे. याआधी अन्य कंपन्यांनीही आपल्या कारच्या किंमतींमध्ये 2 ते 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
जपानची आणखी एक कार निर्माती कंपनी होंडाने आपल्या कारवर श्रेणीनुसार 10 ते 35 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही वाढ ऑगस्टपासून केली जाणार आहे.
ह्युंदाई मोटर्सनेही गेल्या महिन्यात ग्रँड आय 10 च्या किंमतीमध्ये 3 टक्क्यांची वाढ केली होती. तर महिंद्राने पॅसेंजर गाड्यांवर 30 हजार रुपये किंवा 2 टक्के वाढ केली आहे. याचबरोबर लक्झरी कार बनविणाऱ्या ऑडी, मर्सिडिस आणि जग्वार लँड रोव्हर या कंपन्यांनीही सीमाशुल्कात वाढ झाल्याने त्यांच्या कारच्या किमती वाढविल्या आहेत.
मारुतीने तिच्या 11 कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नेक्सा या ब्रँड अंतर्गत येणाऱ्या कारही समविष्ट आहेत.