नवी दिल्ली : ओकिनावा स्कूटर्स कंपनीने भारतात i-Praise ही नवी स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1.15 लाख रुपये असून ही एक इंटेलिजेंट स्कूटर आहे. कंपनी पहिल्याच टप्प्यात केवळ 500 स्कूटर बनविणार आहे, यापैकी 450 स्कूटर आरक्षित झाल्या आहेत.
कंपनीने सांगितले की, या इलेक्ट्रीक स्कूरचा पहिला ग्राहक हे भारतीय नौदल आहे. ही स्कूटर दिसायला सामान्य स्कूटरसारखीच असली तरीही या स्कूटरमधील फिचर अत्याधुनिक आहेत. लिथिअम आयन बॅटरीला 5 अॅम्पीअरचे पावर सॉकेट देण्यात आले आहे. ज्यामुळे घरीही ही स्कूटर आरामात चार्ज करता येणार आहे. कंपनीने 100 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत सांगितले नसले तरीही ही स्कूटर 3 ते4 तासांच्या चार्जिंगमध्ये 160 ते 180 किमी धावू शकणार आहे. तसेच ही स्कूटर अन्य स्कूटरपेक्षा 30 ते 40 टक्के हलकी आहे.
इंटेलिजन्ट स्कूटर कशी?या स्कूटरला मोबाईल अॅपद्वारे नियंत्रणात ठेवता येते. हे अॅप गूगल प्लेस्टोअरवर मिऴते. तसेच जियो फेसिंग, व्हर्च्युअल स्पीड लिमिट, कर्फ्यु अवर्स, बॅटरी हेल्थ ट्रॅकर, SOS नोटिफिकेशन, ट्रीप, डायरेक्शन, मेन्टेनन्स आणि व्हेईकल स्टेटस असे फिचर्स मिळतात. जियो फेसिंगद्वारे वाहन मालक स्कूटरची रेंज 5 ते 10 किमी अशी सेट करू शकतो. यापेक्षा स्कूटर लांब गेल्यास नोटिफिकेशन येण्यास सुरुवात होते. व्हर्च्युअल स्पीड लिमिट हे पेरेंटल कंट्रोल फिचर आहे. वेगात गाडी चालविल्यास पालकांकडे अलर्ट जातो. शिवाय मेन्टेनन्स, बिघाड झाल्यास यासंबंधीच्या सुचनाही मिळतात.