नवी दिल्ली – देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी OLA नं अलीकडेच ऑटो मार्केटमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल OLA S1 AIR लॉन्च केली आहे. या स्कूटरची Ex Showroom किंमत १ लाख ९ हजार ९९९ इतकी आहे. ३१ जुलैपर्यंतच ही किंमत ग्राहकांना मिळणार होती. परंतु आता येत्या १५ ऑगस्टपर्यंत या ऑफरची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत OLA स्कूटर खरेदी करण्याची संधी आहे.
ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मुदतवाढीची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, S1 Air मागणी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे. अनेकांनी आम्हाला १.१ लाखाची ऑफर खुली ठेवावी असं म्हटलं आहे. आता ही ऑफर आज रात्री ८ ते १५ ऑगस्ट रात्री १२ पर्यंत सर्वांसाठी खुली करण्यात येत आहे. आमचे सगळे स्टोअर आज मध्यरात्रीपर्यंत सुरु राहतील. फास्ट डिलिवरीसाठी आजच खरेदी करा असं आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.
ओला एस १ एअर, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. सध्या ही स्कूटर अवघ्या १ लाख १० हजार रुपयांत मिळतेय. त्यानंतर या किंमतीत १० हजारांनी वाढ होणार आहे. म्हणजे या स्कूटरची किंमत १ लाख १९ हजार इतकी होईल. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर नवीन नयॉन ग्रीन(Neon Green) कलरमध्ये लॉन्च केली.
कशी आहे नवीन OLA S1 Air?
कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरची टेस्टिंग ५ लाख किलोमीटर पर्यंत केली आहे. सुरुवातीला २.७ KW मोटारसह ही लॉन्च केली त्यानंतर आता ४.५ KW यूनिटसह ती अपग्रेड केली आहे. त्याशिवाय बेल्ट ड्राइव्हऐवजी हब मोटारचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक बदल केले आहेत. जेणेकरून त्याची किंमत कमी करता येईल. स्कूटरमध्ये फ्रंटला डिस्क ब्रेक आणि मागील चाकाला ड्रम ब्रेक दिला आहे.
बॅटरी पॅक अन् ड्रायव्हिंग रेंज
OLA S1 Air मध्ये कंपनी ३KW क्षमतेची बॅटरी पॅक देते. ओला इलेक्ट्रिकचा दावा आहे की, ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये १२५ किलोमीटर रेंज देते. परंतु कंपनीने चार्जिंग टायमिंगबाबत काही माहिती दिली नाही. या स्कूटरचा टॉप स्पीड ८५ किमी आहे. त्यात ३ ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहे. ज्यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. ही स्कूटर अवघ्या ३.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे.