Ola Electric चे बाजारात नाव-गाव नसतानादेखील लोकांनी पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरला मोठा प्रतिसाद दिला आहे. ओलाने स्वातंत्र्यदिनी ओला इलेक्ट्रीक स्कूटरची दोन मॉडेल लाँच केली होती. कंपनीला पहिल्याच फटक्यात 1200 कोटींहून अधिकची बुकिंग मिळाली होती. या स्कूटरची ट्रायल ओलाने देण्यास सुरुवात केली असून लवकरच ही स्कूटर रस्त्यावर दिसणार आहे.
बंगळुरूमध्ये ओलाच्या स्कूटरची टेस्ट राईड सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना थेट डिलिव्हरी करण्याची योजना कंपनीने थोडी पुढे ढकलली आहे. आधी टेस्ट राईड, त्यानंतर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर एस१ आणि एस१ प्रो डिलिव्हर केली जाणार आहे. यामुळे जर तुम्ही बुकिंग केली नसेल तर तुम्हाला ही Ola S1 Electric स्कूटर बुक करण्याची आणखी एक संधी ओला घेऊन येणार आहे.
16 डिसेंबरपासून ओलाची ही स्कूटर बुक करता येणार आहे. यासाठी महिनाभर तुम्हाला वाट पहावी लागणार आहे. तसेच ज्या लोकांनी ही स्कूटर बुक केली आहे त्यांना डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान डिलिव्हरी दिली जाणार आहे.
ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या भव्य यशानंतर ओला आता बाईकवर काम करत आहे. यामुळे बाईक प्रेमींसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे. ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुढील वर्षी बाईक येणार असल्याचे कन्फर्म केले आहे. स्कूटरनंतर कार येणार असल्याचे अग्रवाल म्हणाले होते. परंतू त्याला आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. तोवर बाईक आणि कमी किंमतीतील आणखी एक स्कूटर बाजारात आणण्याची ओलाची योजना आहे.