नवी दिल्ली : भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने Ola S1 आणि Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना मोफत फ्रंट फोर्क बदलण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, कंपनीने फ्रंट फोर्कचे डिझाईन बदलले आहे आणि त्याला "अपग्रेडेड फोर्क" असे नाव दिले आहे.
दरम्यान, नवीन डिझाइन स्कूटर अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवेल, असे इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीचे म्हणणे आहे. हे अपग्रेड Ola S1 आणि S1 Pro स्कूटर ग्राहकांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी 22 मार्चपासून अपॉइंटमेंट विंडो उघडली जाईल आणि कंपनी लवकरच अपॉइंटमेंट बुक करण्याची सविस्तर प्रक्रिया सांगेल. या संदर्भात कंपनीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका प्रेस नोटमध्ये ओलाने म्हटले आहे की, "अलीकडे फ्रंट फोर्क आर्मच्या सुरक्षेबाबत कम्युनिटीमध्ये काही चिंता व्यक्त केली जाते. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, हे निराधार आहे. ओलामध्ये फ्रंट फोर्क आर्मसह आमच्या स्कूटर्सचे सर्व कंपोनेंटची टेस्टिंग एक्सटेंसिव्ह कंडीशनमध्ये असते आणि वाहनावरील सामान्य भाराच्या वजनापेक्षा जास्त सुरक्षिततेच्या घटकांसह इंजिनिअर केले जाते."
फ्रंट फोर्क तुटण्याचा धोकाखड्ड्यांतून जाताना इलेक्ट्रिक स्कूटरचा फ्रंट फोर्क तुटल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. यामुळे अनेक स्कूटर मालकांना दुखापतही झाली आहे. आता कंपनीने सस्पेन्शन चाकाला जोडणारा भाग वाढवला आहे. दरम्यान, ओला Ola S1 आणि S1 Pro मध्ये सिंगल-साइड फ्रंट फोर्क डिझाईन वापरण्यात आले आहे, जे गॅब्रिएलने पुरवले आहे.
अशी मिळेल अपॉइंटमेंटओलाच्या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air च्या फ्रंटमध्ये जुन्या पद्धतीचा टेलिस्कॉपिक फोर्क वापरण्यात आला आहे. मार्च 2023 पर्यंत देशभरात 500 एक्सपिरिएंस सेंटर उघडणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांना ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल, त्यानंतर एक टेक्निशियन येईल. कंपनी सध्या केवळ बुकिंग आणि पेमेंट प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करत आहे. दरम्यान, तुम्हालाही फ्रंट फोर्क बदलायचा असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. कंपनीने सांगितले की, व्हिजिट करण्यापूर्वी, ग्राहक जवळच्या ओला एक्सपिरिएंस सेंटर किंवा सर्व्हिस सेंटरद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकतील.