पेट्रोलचे दर वार्षिक उच्चांकावर; डिझेलच्या किंमतीतही मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 10:21 AM2019-12-09T10:21:34+5:302019-12-09T10:21:59+5:30
डिसेंबरमध्ये मुंबईत पहिल्या आठवड्यात एकदाच डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती.
नवी दिल्ली : पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या असून लोकसभा निवडणूक काळात स्थिर राहिलेल्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोलची किंमत 9 पैशांनी वाढल्याने यंदाचा उच्चांक गाठला आहे. तर डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून लिटरमागे 26 पैशांनी महागले आहे.
नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 75 रुपये तर डिझेलची किंमत 66.04 रुपये झाली. तर मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 80.65 रुपये आणि डिझेलची किंमत 69.27 रुपये झाली आहे. बेंगळुरूमध्ये 77.57 रुपये पेट्रोल आणि 68.29 डिझेलची किंमत झाली आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोलसाठी 79.81 रुपये आणि डिझेलसाठी 72.07 रुपये मोजावे लागणार आहेत.
डिसेंबरमध्ये मुंबईत पहिल्या आठवड्यात एकदाच डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ 6 पैशांची होती. तर आज 21 पैशांची मोठी वाढ झाली आहे. तर पेट्रोलमध्ये 14 पैशांची वाढ झाली आहे. काल पेट्रोलचा दर 80.51 रुपये होता. जानेवारी 2019 मध्ये पेट्रोलचा दर 73.95 रुपयां एवढा खाली गेला होता. तर 2 ऑक्टोबरला पेट्रोलचा दर 80. 21 रुपये झाला होता. आज किंमतींनी वर्षाचा सर्वाधिक दर गाठला आहे.
सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय कपात करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाचे दर आता जवळजवळ सर्वोच्च पातळीच्या जवळपास आहेत.