सुरत : इच्छा तिथे मार्ग! हे सुरतच्या एका 60 वर्षांच्या दिव्यांगाने खरे करून दाखविले आहे. लहानपनीच पोलिओमुळे अधू असलेल्या विष्णू पटेल यांनी मोटारसाकलचे खराब भाग, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या बॅटरीद्वारे ई बाईकच बनविली आहे. ही आयडियाची कल्पना थेट प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना भावली आणि त्यांनी मोठी घोषणाच करून टाकली.
महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मिडीयावर कमालीचे अॅक्टिव्ह असतात. ते असे अनोखे शोध, विविध विषयांवर प्रोत्साहनपर बक्षीसे जाहीर करत असतात. तसेच अनेकदा तर त्यांनी अफलातून काहीतरी करणाऱ्या व्यक्तींना स्कॉर्पिओसारखी एसयुव्हीही भेट म्हणून दिल्याचे आपण ऐकले आहे. या उद्योगपतीच्या कानावर विष्णू यांची ही हुशारी गेली आणि त्यांनी मोठी योजनाच जाहीर केली आहे.
त्यांनी ट्विटरवर विष्णू पटेल यांच्याबाबतीत लिहिलेल्या एका पोस्टवर ट्विट केले आहे. ''छान बातमी आहे. मी विष्णू पटेल यांच्याशी संपर्क करने आणि त्यांच्या वर्कशॉपला अद्ययावत करण्यासाठी मी गुंतवणूक करू शकतो का हे विचारेन. खरेतर मला विष्णू यांनी प्रेरित केले आहे. मी देशाच्या छोट्या उद्योजकांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा विचार करत आहे. कारण अशा प्रकारचे अनेक शोध आणि त्यांच्यातील हुशारी सर्वांसमक्ष येण्याच्या प्रतिक्षेत आहे.'', असे या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे.