स्कूटर घेण्यापूर्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:25 PM2017-08-09T14:25:34+5:302017-08-09T14:25:56+5:30

स्कूटर ही शहरामध्ये अनेकांच्या दळणवळणासाठी नित्याचीच गरज झाली आहे. तिचा दैनंदिन होणारा वापर पाहाता, स्कूटर खरेदीपूर्वी तिचे गुणावगुण ठरवा केवळ रूपावर भाळू नका.

 before purchase a scooter | स्कूटर घेण्यापूर्वी

स्कूटर घेण्यापूर्वी

Next

कधी एकदा लायसेन्स काढण्यासाठी १८ वर्षे पूर्ण होतात व कधी स्कूटर खरेदी करत आहोत, किंवा प्रवासाची एक गरज म्हणून स्कूटर घेण्याची इच्छा... अशा या इच्छेला अनेकजण अगदी जिद्दीने पूर्णही करतात, पण स्कूटर घेतल्यानंतर काही कटकटी, त्रास त्यांना सहन करावा लागतो. यासाठी थोडा अभ्यासही गरजेचा असतो. अन्यथा नंतर पस्तावण्याचीही वेळ येते. 

आज स्कूटरच्या बाजारामध्ये अनेक कंपन्या आपल्या स्कूटरच्या विविध मॉडेल्ससह उभ्या ठाकल्या आहेत. प्रत्येक कंपनी आपली स्कूटर कशी चांगली आहे, आपली सेवा कशी चांगली आहे, मायलेज कसे जास्त देते याची भलावण करीत असतात. पण त्यामागे अर्थातच त्यांचे लक्ष्य वेगळे असते. त्यांचे जसे लक्ष्य असते, तसेच ग्राहक म्हणूनही तुमचे लक्ष्य असले पाहिजे. 

सर्वसाधारणपणे स्कूटर घेण्यापूर्वी विविध कंपन्यांच्या स्कूटर्सबद्दल माहिती करून घेताना त्यांचे तांत्रिक तपशील माहिती करून घ्या. स्कूटर्सच्या कंपन्यांच्या प्रमाणेच त्यांच्या त्यांच्या मॉडेल्सनुसारही काही सुविधा, किंमती यात फरक आहे. सध्या बहुतांशी स्कूटर्स या १०० सीसी ते १२५ सीसी इतक्या क्षमतेच्या वा ताकदीच्या मिळत असून त्या सर्व ऑटोगीयर आहेत. काही इलेक्ट्रिक स्कूटर्सही बाजारात उपलब्ध आहेत. सस्पेंशन्स, स्कूटरची बॉडी म्हणजे फायबर व पत्र्यामध्ये हवी की कसे, त्याचे फायदे तोटे, मोबाईल चार्जिंगच्या सुविधाही त्यात आहेत, पुढील हेल्मेट बॉक्स वा सीट खालील जागा किती आहे, त्याची माहितीकरून घ्या व तुलना करा. तसेच तुमची आर्थिक बाब लक्षात घेतल्यानंतर त्यानुसार त्या स्कूटरमध्ये अतिरिक्त सुविधा म्हणून दाखवले जाणारे आकर्षण खरोखरच गरजेचे आहे की नाही ते पाहा.  सुरुवातीला या सुविधांचे अप्रूप असते नंतर मात्र त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही किंवा त्या खराब झाल्या तर दुरुस्तही केल्या जात नाहीत. यासाठीच सुविधांबाबत दक्ष राहा. स्कूटर्सच्या कंपनीची सर्व्हिस सेंटर्स तुम्हाला जवळ आहेत का, तेही लक्षात घ्या. सर्व्हिस सेंटर लांब असणे हे तोट्याचे व त्रासाचे असते, तसेच ही सेंटर्स तुमच्या शहरात पुरेशी आहेत का ते ही लक्षात घ्या.मायलेजचा विचार करता कंपनी सांगते त्यापेक्षा प्रत्यक्षात ते कमी मिळते, कारण त्या स्कूटर्सचे मायलेज ही बाब ठरावीक चाचण्यांच्या व विशिष्ट पद्धतीमध्ये निश्चित केलेले असते. तुमची स्कूटर चालवण्याची पद्धत, तसेच तुमचे नित्याचे रस्ते, वाहतूक यांचा विचार करता ते तितकेच मिळणार नाही हे पक्के लक्षात घ्या. स्कूटर व मोटारसायकल यांची सीसी क्षमता एकच असली तरीही त्यांच्या मायलेजमध्ये फरक असतो. त्यामुळे त्या दोहोंमध्ये तुलना करू नका. स्कूटर घेण्याआधी तुमच्या गरजा, तुम्ही त्या स्कूटर्सकडून काय किमान अपेक्षा धरत आहात, ते लक्षात घ्या. स्कूटरच्या रंगसंगतीबाबतही पर्याय असल्याने नोंदवलेल्या रंगानुसार ती मिळत आहे की नाही, ते ही पाहा. स्कूटर्सची उंची तुम्हाला योग्य आहे का, टायर्स चांगले आहेत का, हेडलॅम्प रात्रीच्यावेळी चांगले प्रकाश देणारे आहेत का, स्कूटरची बॉडी पत्र्याची आहे की फायबरची हे सारे गुणावगुण तुम्हालाच ठरवायचे आहेत. त्यासाठी केवळ रूप पाहू नका, स्कूटरचे गुण पाहा. उपयुक्तता व सुरक्षितता हे महत्त्वाचे अन्यथा नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते; आणि ती टाळणे हेच महत्त्वाचे नाही का?

Web Title:  before purchase a scooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.