कार घेण्याची ऐपत असते पण ती घेऊन करू काय, वापर करू तरी कसा असेही प्रश्न काहींच्या मनात उभे राहातात. विशेषतः जुन्या पिढीतील अशा अनेक व्यक्ती होत्या की त्यांना स्वतःची मोटार घेणे परवडत होते, नव्हे दोन-तीन मोटारींचा ताफा बाळगण्याचीही त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. पण तरीही त्यांनी मोटार न घेता सार्वजनिक वाहनांचा वापर केला. तो काळ वेगळा जरी असला तरी आजच्या काळात कार घेण्याची आर्थिक स्थिती चांगली असूनही ती न घेण्याची मानसिकता असणारे अनेक लोक आहेत. गरज नाही, उगाच घेऊन काय करू, मला कुठे चालवता येते, शहरात काही गरज नाही, वाहतूककोंडी, रस्त्यावर पार्किंगची समस्या मग काय करायची मोटार... अशी कारणे आहेत पण तरीही त्यांच्या मनात, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात मोटार घेण्याची सुप्त इच्छा असते. त्या व्यक्तीलाही ते पटते पण कार घेतली तर पुरेसा वापर करावा कसा हा प्रश्न त्याला सतावत राहातो.मुळात कार ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे एक साधन आहे. त्यामुळे तुमच्या उपलब्ध आर्थिक स्थितीनुसार तुम्ही त्या वाहनाची निवड करू शकता. स्वतःला एकट्याला वापरायची नसेल, वाहन चालवायची भीतीही नसेल तर सर्व कुटुंबीयांना त्याचा लाभ घेता यावा या विचाराने कार घ्यायला काही हरकत नाही. शहरी वाहतूककोंडी नको वाटते मग किमान शहरात नको तर बाहेरगावी जाण्यासाठी, सहकुटुंब फिरायला जाण्यासाठी कारचा वापर तुम्ही करू शकता. खरे म्हणजे आता कार हवीहवीशी वाटते... पण कारणे शोधतो असतो आपण. का न घेण्याची कारणे जशी असतात तशी ती घेण्याचीही कारणे असतात, तुमची फक्त इच्छा हवी.साधारणपणे वर्षाला किमान १२ ते १५ हजार किलोमीटर प्रवास वा रनिंग करणार असाल तर कार घ्यायला हरकत नाही. त्यासाठी रोज शहरात वापर करायलाच हवा असे नाही. वार्षिक हिशोब करता महिन्यातून किमान दोनवेळा १००० किलोमीटर इतका प्रवास तुमचा होणार असेल तर व्यावहारिकदृष्टीने कार घ्यायला हरकत नाही. कार घेतली व नुसतीच दारात उभी करून ठेवली असेही कोणी म्हणायला नको. पण एक खरे की, कारसाठी , तिच्या देखभालीसाठी वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे कारचा पुरेसा वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला दररोज शहरी रस्त्यावर कार चालवण्याची आवश्यकता नसली तरी सरासरी वापरामुळे कारचे मूल्य नक्कीच वसूल होऊ शकते, इतकेच नव्हे तर दीर्घकाळ कार वापरू शकता. फक्त तुमचा दृष्टिकोन तसा हवा. तुमच्या कारचा पुरेसा वापर हेच तिचे मूल्य असेल, हे ध्यानात ठेवा..
कारचा पुरेसा वापर हेच तिचे खरे मूल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:52 AM