नवी नको, सेकंड हँड कारच घरासमोर हवी; ग्राहकांची मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:27 AM2022-09-15T11:27:23+5:302022-09-15T11:27:41+5:30
बाजार जोमात, वित्त वर्ष २०२६-२७ पर्यंत जुन्या कारची विक्री ८० लाख युनिटपर्यंत जाऊ शकते. २०२६-२७ पर्यंत जुन्या कारच्या विक्रीत १९.५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
मुंबई : ग्राहकांची सेकंड हँड कारला मागणी वाढली असून, सेकंड हँड कारचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारला जात आहे. देशात सेकंड हँड म्हणजेच जुन्या कारचा बाजार २०२६-२७ पर्यंत वार्षिक १९.५ टक्के दराने (सीएजीआर) वाढेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
इंडियन ब्लूबुक आणि दास वेल्ट ऑटो यांनी २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्तरीत्या हा अहवाल तयार केला आहे. अहवालाची ही पाचवी आवृत्ती आहे. जुन्या कार आणि बाइक बाजाराचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, सध्या जुन्या कारचा बाजार २३ अब्ज डॉलरचा आहे. अहवालानुसार, गेल्या वित्त वर्षात देशात ३५ लाखांपेक्षा अधिक जुन्या कारची खरेदी-विक्री झाली. २०२०-२१ च्या विक्रमी आकड्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. या काळात जागतिक पातळीवर ४ कोटींपेक्षा अधिक जुन्या कार विकल्या गेल्या आहेत.
अहवालात म्हटले आहे की, वित्त वर्ष २०२६-२७ पर्यंत जुन्या कारची विक्री ८० लाख युनिटपर्यंत जाऊ शकते. २०२६-२७ पर्यंत जुन्या कारच्या विक्रीत १९.५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या कालावधीत जुन्या कारचे नव्या कारसोबतचे गुणोत्तर १.९ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
का वाढतेय मागणी?
कोरोना साथीनंतर जुन्या कारच्या बाजारास मोठी गती मिळाली आहे. २०२६ पर्यंत छोट्या शहरांत जुन्या कारची मागणी वार्षिक ३० टक्के दराने वाढू शकते. प्रमुख ४० शहरांत हा दर १० टक्के राहण्याची शक्यता आहे. जुन्या वाहनांच्या बाजारातील वाढीस कारची उपलब्धता, खर्च करण्यायोग्य उत्पन्नामुळे कार व दुचाकी वाहनांच्या सरासरी मालकी कालावधीतील कपात आणि कमी कालावधीत नवीन मॉडेल बाजारात येणे यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांचे मन वळत आहे.