देशातील सेकंड हँड किंवा युज्ड कार मार्केट 2026-27 पर्यंत 19.5 टक्के वार्षिक दराने वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, देशातील वापरलेल्या कारची बाजारपेठ सध्या 23 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2026 पर्यंत देशातील छोट्या शहरांमध्ये सेकंड-हँड कारची मागणी दरवर्षी 30 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर देशातील प्रमुख 40 शहरांमध्ये वापरलेल्या कारची मागणी दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इंडियन ब्लूबुक आणि दास वेल्टऑटो यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 साठी सेकंड हँड कार आणि बाईक उद्योग अहवालाच्या 5 व्या आवृत्तीनुसार, या क्षेत्रातील वाढ अनेक कारणांमुळे होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्टिफाईड कारची उपलब्धता, दुचाकींच्या मालकीच्या सरासरी कालावधीत घट, कमी कालावधीत नवीन मॉडेल्स लाँच करणे इत्यादींचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या आर्थिक वर्षात देशात 35 लाखांहून अधिक सेकंड हँड कार विकल्या आणि विकत घेतल्या गेल्या. हा आकडा 2020-21 या आर्थिक वर्षातील विक्रमी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, याच कालावधीत जगभरात 40 दशलक्षहून अधिक सेकंड हँड कार विकल्या गेल्या आहेत. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत देशात सेकंड हँड कारची विक्री 8 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत दरवर्षी 19.5 टक्के वाढीचा अंदाज आहे. जुन्या कार आणि नवीन कारचा रेशो या कालावधीत 1.9 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.