पुणे : कार वेगात असताना ब्रेकफेल झाल्याने अपघात झाल्याचे अनेकदा आपण पाहिले आहे. विविध कारणांनी ब्रेकफेल हाेत असतात. अशातच ब्रेक लागत नसल्याचे कळाल्यानंतर चालक पॅनिक हाेताे. ब्रेकफेल झाल्यानंतरही तुम्ही अवघ्या 8 सेकंदामध्ये तुमची गाडी सुरक्षितरित्या थांबवू शकता त्यासाठी या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
गाडी खूप वेगात आहे आणि तुमच्या लक्षात आले की गाडीचे ब्रेक लागत नाहीयेत, अशावेळी अजिबात घाबरुन जाऊ नका. सुरुवातीला ब्रेक पेडल दाेनवेळा जाेरात दाबून बघा. अनेकदा असे केल्याने ब्रेक लागण्याची शक्यता असते. तरीही ब्रेक लागत नसेल आणि गाडी वेगात असेल तर तुमच्या गाडीचा हॅण्ड ब्रेक अर्ध्यावर ओढा. असे केल्याने गाडीचा वेग काही प्रमाणात कमी हाेईल. जर तुमची गाडी चाैथ्या गिअरमध्ये असेल तर गाडीला तिसऱ्या आणि त्यानंतर दुसऱ्या गिअरमध्ये आणा. असे केल्याने थाेडासा झटका बसून गाडीचा वेग बऱ्यापैकी कमी हाेईल. त्यानंतर हॅण्डब्रेक पूर्ण ओढा. असे केल्याने तुमची गाडी सुरक्षितरीत्या जागेवर थांबेल, तेही अवघ्या आठ सेकंदामध्ये.
वरील गाेष्टींचा अवलंब केल्यास ब्रेकफेल झाल्यानंतरही तुम्ही तुमची कार व्यवस्थित थांबवू शकता. तुम्ही जर हायवेला असाल तर गाडी सुरुवातील बाजूला घ्यायचा प्रयत्न करा, अन्यथा गाडी थांबली आणि मागून वेगात वाहने येत असतील तर ती तुमच्या गाडीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरुन मागील वाहन तुम्हाला धडकणार नाही.