नवी दिल्ली: दिल्लीत बुधवारपासून सुरु झालेल्या Auto Expo 2018 मध्ये जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांकडून त्यांची उत्पादने लाँच करण्यात आली. यामध्ये सुझुकीकडून लाँच करण्यात आलेली लक्झरी स्कुटी अनेकांना आकर्षून घेत आहे. सुझुकीच्या या बर्गमन स्ट्रीट नावाच्या स्कुटीची रचना खास युरोपियन पद्धतीने करण्यात आली आहे. 125 सीसी इंजिनक्षमता असलेली ही स्कुटी यंदा भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. या स्कुटीची किंमत 70 ते 75 हजार रूपयांच्या दरम्यान असेल. याशिवाय सुझुकीकडून बजार एव्हेंजर क्रूजला टक्कर देण्यासाठी सुझुकी इंट्रुडर या बाईकच्या नव्या मॉडेलचेही Auto Expo 2018 मध्ये अनावरण करण्यात आले. या बाईकमध्ये जिक्सर एसएफप्रमाणेच 154.9 सीसीचे इंजिन असेल. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन हे तंत्रज्ञान असणारे इंट्रुडरचे इंजिन 14.8bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करु शकते.
यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. मागच्यावेळी 88 कंपन्या होत्या अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली. विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे.आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल. या ऑटो एक्सपोत बिझनेस हवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक हवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस हवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक हवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे.