धावत्या कारच्या मागे लागलेले लोक आता वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या कंडिशनमुळे वैतागले आहेत. यामुळे हे लोक आता नव्या अशा उडत्या कारच्या मागे लागल्याचे दिसत आहे. स्वीडनच्या ईलेक्ट्रीक व्हेईकल स्टार्टअप जेटसनला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीने हवेत उडणारी कारची विक्री सुरु केली आहे. या कारचे सर्व युनिट्स विकले गेले आहेत.
जेटसन वन या कंपनीच्या या उडत्या कारची बुकिंग फुल्ल झाली आहे. आता या कंपनीसमोर या कारच्या डिलिव्हरीचे आव्हान आहे. पुढील वर्षीपासून या कारची डिलिव्हरी देण्यात येणार आहे. जेटसनने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्लाईंग कार जेटसन वन लाँच केली होती. तेव्हापासूनच या कारची उत्सुकता दिसून आली होती.
जेटसन वन फ्लाईंग कार जमिनीपासून १५०० फूट उंचीवरून उडण्यास सक्षम आहे. ही इलेक्ट्रीक कार आहे. एकदा का फुल चार्ज केली की ३२ किमीची रेंज देते. तसेच १०२ किमी प्रति तास एवढ्या वेगाने ती उडू शकते. ही कार सर्व प्रकारच्या ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ही कंपनी सध्या या कारची विक्री फक्त अमेरिकेतच करणार आहे. ही कार चालविणेही खूप सोपे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. २०२३ साठी सर्व कार बुक झाल्या आहेत. तर आता २०२४ साठी बुकिंग सुरु केली आहे.
जेटसनने फ्लाईंग कारची किंमत ७१ लाख रुपये ठेवली आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार २० मिनिटांसाठी हवेत चालविता येते. टेस्टिंगवेळी या कारमध्ये ८६ किलोचा व्यक्ती होता. तेव्हाची ही आकडेवारी आहे.