नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बऱ्याच दिवसांनंतर आज पुन्हा एकदा वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आता इंधन महाग होत असताना वाहनेही महागणार आहेत. दरम्यान, 1 एप्रिल 2022 पासून टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles) किमती वाढवणार आहे. कंपनी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार 2 ते 2.50 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे, असे टाटा मोटर्सने (Tata Motors) म्हटले आहे.
टाटा मोटर्सने स्टॉक एक्स्चेंजला किमतीत वाढ झाल्याची माहिती देताना म्हटले की, अलीकडच्या काळात स्टील, अॅल्युमिनियम, इतर धातू आणि इतर कमोडिटी मटेरियलच्या किमती वाढल्यामुळे कंपनी व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे. तसेच, कंपनी स्वतःच खर्च वाढीचा मोठा हिस्सा सहन करत आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु इनपुट कॉस्टमध्ये कमालीची वाढ झाल्याने किमान त्याची किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे.
टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. मात्र, टाटा मोटर्सने अद्याप प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ केलेली नाही. 2022 मध्ये कंपनीने दुसऱ्यांदा किमती वाढवल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, 1 जानेवारी 2022 पासून, टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने महाग झाली होती.
मर्सिडीज बेंझ इंडियानेही वाढवली किंमत लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, त्यांचे सर्व मॉडेल्स आता तीन टक्क्यांपर्यंत महाग असतील. लॉजिस्टिक्सच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने जास्त किंमतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, या दरवाढीचा ग्राहकांना फारसा त्रास होऊ नये, यासाठी कंपनीने प्रयत्न केले आहेत.