TATA आता किआ, ह्युंदाईचं टेन्शन वाढवणार! ‘या’ कारचे मिड-साइज कूपे मॉडेल आणणार; पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 04:47 PM2022-01-09T16:47:18+5:302022-01-09T16:48:08+5:30
टाटा मोटर्सने सन २०१८ मध्येच ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी एक मिड-साइज एसयूव्ही आणण्याची योजना आखली होती.
नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात TATA मोटर्सचा दबदबा वाढतच चालला आहे. एकीकडे संपूर्ण क्षेत्र सेमीकंडक्टर चीपच्या संकटात असताना, दुसरीकडे टाटा मोटर्सने ह्युंदाईसारख्या बड्या ब्रँडला मागे टाकत भारतीय बाजारपेठेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. यातच आता टाटाह्युंदाईसह नव्याने भारतीय बाजारात येऊन अल्पवधीच प्रचंड लोकप्रिय झालेल्या किआ मोटर्सचही टेन्शन वाढवण्याचा मोठा बेत आखत आहे. काही महिन्यांपूर्वी बाजूला ठेवलेला एक प्लान अमलात आणून बाजारपेठेवरील आपली पकड आणखी मजबूत करण्याचा आराखडा तयार करत असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून टाटा लागोपाठ आपल्या गाड्याचा पोर्टफोलियो वाढवताना पाहायला मिळत आहे. आगामी काही वर्षांत १० इलेक्ट्रिक कार सादर करण्याचा मानस टाटाचा आहे. टाटा मोटर्स आता लोकप्रिय कार Nexon ला आता मोठ्या साइजमध्ये आणण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेलसह इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ही कार सादर केल्यानंतर ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टॉससारख्या कार्सना जोरदार टक्कर देईल, असे सांगितले जात आहे.
कशी असेल नवीन मिड-साइज Nexon?
नवीन मॉडलची बॉडी स्टाइल, ए-पिलर, विंडस्क्रीन आणि फ्रंट डोर सध्याच्या नेक्सॉन सारखे असेल. मोठ्या बदलासोबत बी-पिलर नंतर पाहायला मिळेल. या कूप मध्ये मोठे रियर डोर्स, स्लीम छत, आणि मोठे ओव्हरहँग सोबत एकदम नवीन रियर पार्ट दिले जाणार आहे. यात मागील बाजुस जास्त लेगरूम आणि मोठे बूटस्पेस सुद्धा मिळेल. व्हीलबेसला 50mm च्या जवळपास वाढवले जाऊ शकते. याची लांबी जवळपास ४.३ मीटर असू शकते, असे सांगितले जात आहे.
टाटा कधी लॉंच करणार नवी कार?
नवीन टाटा नेक्सॉन कूपे एसयूव्ही मध्ये नवीन १.५ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. नवीन इंजिनवर काम सुरू आहे. या इंजिनला २०२३ मध्ये एमिशन नॉर्म्सला डोळ्यासमोर ठेवून ट्यून केले जाईल. नवीन मिड साइज कूपे २०२३ च्या आधी बाजारात आणली जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, टाटा मोटर्स ने २०१८ मध्ये ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी एक मिड साइज एसयूव्ही आणण्याची योजना आखली होती. मात्र, कंपनीची खराब परफॉर्मन्स असल्याने ही योजना पुढे ढकलण्यात आली. आता परिस्थिती अगदी उलट झाली असून, टाटाच्या प्रति महिना ३० हजारांवर कार विकल्या जात आहेत. एका रिपोर्ट नुसार, टाटा मोटर्सने Nexon कूपेचे इलेक्ट्रिक व्हर्जनची आखणी पुन्हा एकदा सुरू केली आहे. इलेक्ट्रिकनंतर मिडसाइज नेक्सॉनचे पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शनमध्ये आणले जाणार आहे. ही नेक्सॉन प्रमाणे X1 प्लॅटफॉर्म वर आधारित असेल.