गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टाटा नेक्सॉन ईव्हीला आग लागली आहे. मुंबईमध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत. वसईतील एका रेस्ट़ॉरंटबाहेर टाटा नेक्सॉन ईव्ही उभी होती. यावेळी नेक्स़ॉनच्या खालच्या भागात जिथे बॅटरी ठेवलेल्या असतात तिथे आग लागली. लागलीच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीनर नियंत्रण मिळविले. टाटा नेक्सॉन ईव्हीला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाटा मोटर्सने यावर स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनी टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करेल. यानंतरच या घटनेवर माहिती देईल.
यावर ओला ईलेक्ट्रीकचे मालक भाविश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही कंपनीच्या ईव्हींना आग लागू शकते. जागतिक दर्जाच्या उत्पादनांनाही आगी लागल्या आहेत. परंतू आयसीई पेक्षा ईव्हींना आगी लागण्याचे प्रमाण कमी आहे. असे म्हटले आहे. ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे अग्रवाल कमालीचे ट्रोल झाले होते. आता टाटाच्या ईव्ही कारला आग लागल्याने अग्रवाल यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.