मुंबई : भारताची आतापर्यंतची सर्वात सुरक्षित असलेली मिनी एसयुव्ही Tata Nexon ची इलेक्ट्रीक कारवरून टाटा मोटर्सने पडदा उठविला आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत जानेवारीमध्ये लाँच केली जाणार असून बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू झाले आहे.
टाटाची ही दुसरी इलेक्ट्रीक कार आहे. या आधी टाटाने टिगॉकची इलेक्ट्रीक कार लाँच केली होती. मात्र, नेक्सॉनमध्ये अद्ययावत झिपट्रॉन हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे या कारची रेंज 300 किमीपेक्षा जास्त असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
नेक्सॉनला मॅग्नेंट एसी मोटर देण्यात आले आहे. याला लिथिअम आयनच्या बॅटरीद्वारे वीज मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या बॅटरीला 8 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या बॅटरीची कॅपॅसिटी 30.2 kWh आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार 300 किमीचे अंतर पार करणार आहे.
ईलेक्ट्रीक मोटर 129hp ची ताकद आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करते. टाटा मोटर्सने दावा केला आहे की, 4.6 सेकंदामध्ये 60 किमी प्रति तास आणि 9.9 सेकंदामध्ये 100 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या इलेक्ट्रीक मोटरला 10 लाख किमीहून जास्त टेस्ट केले आहे.
नेक्सॉनची बॅटरी फास्ट चार्जरद्वारे 60 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्ज होते. तर साध्या चार्जरमुळे 8 तास लागतात. फास्ट चार्जरद्वारे एका मिनिटाला 4 किमीचे अंतर पार करण्याची वीज मिळणार आहे. 50 टक्के चार्जमध्ये 150 किमीचे अंतर कापू शकते.
नेक्सॉन ईव्ही तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केली जाणार आहे. या कारची किंमत 15 ते 17 लाखांच्या आसपास असणार आहे. साध्या नेक्सॉनसारखाच लूक असला तरीही काही बदल करण्यात आले आहेत. तसेच 7 इंचाचा इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यावर बॅटरीची रेंज व अन्य सारी माहिती मिळणार आहे. ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राईव्ह मोड, कीलेस एन्ट्री आणि पुश स्टार्ट बटन आदी सुविधा तिनही व्हेरिअंटमध्ये सारख्या असणार आहेत. तर टॉप व्हेरिअंट XZ+ LUX मध्ये सनरूफ, लेदर फिनिश सीट, अॅटोमॅटीक वायपर, हेडलाईट देण्यात येणार आहेत.