टोयोटाने त्यांची सर्वात नावाजलेली लक्झरी कार इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल व्हर्जनचे बुकिंग घेणे बंद केले आहे. यामागचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी ऑनलाईन बुकिंग करतेवेळी फक्त पेट्रोल इंजिनचा पर्याय दिसू लागला आहे. यामुळे एकतर ग्राहकांना काही काळ थांबावे लागणार आहे किंवा पेट्रोल इंजिनची कार विकत घ्यावी लागणार आहे.
टोयोटाने तात्पुरत्या स्वरुपात बुकिंग थांबविले आहे. वेटिंग पिरिएड वाढत चालला होता, यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. क्रिस्टाच्या डिझेल इंजिनला मोठी मागणी आहे. यामुळे या कारला बुकिंगही जास्तच मिळतात. अनेक कंपन्यांनी इनोव्हाला तोड काढायचा प्रयत्न केला होता, तरी इनोव्हाची क्रेझ या कंपन्या काही कमी करू शकल्या नाहीत.
कंपनीने बुकिंग थांबविलेले असले तरी आधी ज्या ग्राहकांनी कार बुक केलीय त्या ग्राहकांना कंपनी डिझेल इंजिनच्या कार पुरविणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल इनोव्हा क्रिस्टलची एक्स-शोरूम किंमत 17 लाख 45 हजार रुपयांपासून सुरू होते आणि त्याची कमाल एक्स-शोरूम किंमत 23 लाख 80 हजार रुपयांपर्यंत आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची पेट्रोल आवृत्ती पाच मॅन्युअल आणि तीन ऑटोमॅटिक्ससह एकूण आठ ट्रिम्स (2.7 GX (-) 7S MT, 2.7 GX 7S MT, 2.7 GX 8S MT, 2.7 GX 7S AT, 2.7 GX 8S AT सह ऑफर केली आहे.
डिझेल इंजिन बंदच करणार? पर्यावरणाची हानी होत असल्याने अनेक कंपन्यांनी डिझेल इंजिनच्या कार उत्पादन करणे बंद केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी मारुतीचाही सहभाग आहे. मारुतीचा टोयोटासोबत सहकार्य करार आहे. दोन्ही कंपन्या एकमेकांचे प्लॅटफॉर्म वापरून कार विकत आहेत. यामुळे टोयोटा देखील डिझेल इंजिनच्या कार बंद करणार का, असाही सवाल विचारण्यात येत आहे.