जगभरातील लाखो लोक रस्ते अपघातात आपला प्राण गमावत असतात. आपण यापूर्वी चार चाकींमध्ये एअरबॅग्स मिळत असल्याचं तर ऐकलंच असेल. त्यामुळे चारचाकींच्या अपघातात प्राण गमावणाऱ्यांच्या संख्येत थोडी तरी घट झाली आहे. परंतु आताही दुचाकी अपघातात अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे.
एखादा अपघात घडल्यास दुचाकीस्वाराला कसं वाचवता येईल यावर अनेक दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्या काम करत आहेत. परंतु आता दुचाकीमध्ये एअरबॅग्स देण्यावर चर्चा सुरू आहे. याचाच अर्थ कारप्रमाणे लवकरच बाईक आणि स्कूटरमध्येही एअरबॅगचं फीचर मिळणार आहे.
स्कूटर आणि बाईकमध्ये एअरबॅगचं फीचर देण्यावर Piaggio कंपनी काम करत आहे. कंपनीनं यासाठी ऑटोमेटिव्ह सेफ्टी देण्यारी कंपनी Autoliv सोबत एक करार केला आहे. सध्या या दोन्ही कंपन्या दुचाकींसाठी एअरबॅग्स तयार करण्यावर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Autoliv कंपनी अॅडव्हान्स सिम्युलेशन टूलसोबत या एअरबॅगचं सुरूवातीचं कॉन्सेप्ट तयार केलं आहे. याची क्रॅश टेस्टही करण्यात आली आहे. आता कंपनी यात अधिक सुधारणा करण्यावर काम करत आहे.
सेकंदात उघडणार एअरबॅगसमोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये वाहनाच्या फ्रेमवर एअरबॅग लावण्यात येणार आहे. जर अपघात झाला तर लगेच ज्याप्रकारे कारमध्ये एअरबॅग ओपन होतात त्याप्रमाणे सेकंदभरात ही एअरबॅग ओपन होईल. "लोकांच्या सुरक्षेसाठी कंपनी कटिबद्ध आहे. दुचाकी चालकच्या सुरक्षेसाठी आम्ही एक प्रोडक्ट तयार करत आहोत, जो अधिक सुरक्षा देईल. २०३० या वर्षापर्यंत दरवर्षी १ लाख लोकांचे प्राण वाचवण्याच्या दिशेने दुचाकीसाठी एअरबॅग्स तयार करण्यात येतील," अशी माहिती ऑटोलिव कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष मिकेल ब्रॅट यांनी दिली.