हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ही देशातील क्रमांक एकची दुचाकी विक्रेता कंपनी आहे. मात्र, आता तिचे सिंहासन धोक्यात असल्याचे दिसत आहे. कारण Honda Motorcycles and Scooters India (HMSI) सप्टेंबर 2022 मध्ये किरकोळ विक्रीच्या बाबतीत Hero MotoCorp च्या तुलनेत अगदी थोडे मागे आहे. जपानी ऑटोमेकर Honda ची सप्टेंबर 2022 मधील विक्री आणि सध्या मार्केटमधील लीडर असलेल्या Hero ची विक्री यातील अंतर केवळ 1,400 युनिट्स एवढे आहे.
हिरोने देशांतर्गत बाजारात 507,690 युनिट्सची विक्री केली आहे. तर 12,290 युनिट्सची निर्यात केली आहे. अशा प्रकारे हिरोची एकूण विक्री 5,19,980 युनिट्स एवढी होती. तसेच होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची (एचएमएसआय) देशांतर्गत बाजारातील विक्री 488,924 युनिट्स, तर निर्यात 29,635 युनिट्स एवढी होती. अशा प्रकारे सप्टेंबर 2022 मध्ये होंडाची एकूण विक्री 7.6 टक्क्यांनी वाढून 5,18,559 युनिट्सवर पोहोचली आहे. मात्र, वाहन पोर्टलनुसार, मासिक देशांतर्गत दुचाकींच्या किरकोळ विक्रीच्या बाबतीत हिरो यापूर्वीच आपल्या अव्वल स्थानावरून घसरली आहे. या पोर्टलनुसार, सप्टेंबर 2022 मध्ये होंडाने 285,400 युनिट्स आणि हिरोने 251,939 युनिट्सची विक्री केली आहे.
Hero MotoCorp भारतीय दुचाकी क्षेत्रात आघाडीवर आहे. पण गेल्या काही महिन्यांतील विक्री डेटा बघता, होंडा सातत्याने हिरो मोटोकॉर्पच्या जवळ जाताना दिसत आहे. हिरो आणि होंडा यांच्यात 2022 मध्ये रिटेल विक्रीतील अंतर 1.70 लाखपेक्षा अधिक होते. ते जूनमध्ये कमी होऊन एक लाख आणि जुलैमध्ये जवळपास 53,356 युनिट्सवर आले आहे. महत्वाचे म्हणजे हे अंतर ऑगस्ट महिन्यात आणखी कमी होऊन 20,658 युनिट्सवर आले आहे.