स्कूटर वा मोटारसायकल यांना काही वर्षांपूर्वी साइड इंडिकेटर्सचे दिवे लावण्याची सक्ती सुरू झाली. त्यानुसार साधारण १९८८-८९ च्या सुमारास साइट इंडिकेटर्सची सुविधा मोटारसायकल व स्कूटर्सना लावण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे साइड इंडिकेटर्सचे दिवे स्कूटरच्या बॉडीपत्र्यामध्ये सुरुवातीला इनबिल्ट नव्हते, ते स्वतंत्रपणे जोडलेले वाटत. कालांतराने स्कूटर व मोटारसायकल कंपन्यांनी हे आरेखनामध्ये अंतर्भूत केले. आज स्कूटरमध्ये विविध प्रकारे हे दिवे आरेखनात सुबकतेने बसवलेले दिसून येतात. मोटारसायकलीलाही स्वतंत्रपणे पाठी दिसतात. एकूण साइडइंडिकेटर्सचा वापर तेव्हा सुरू झाला. आज त्याला इतकी वर्षे लोटली आहेत मात्र अजूनही अनेक दुचाकी स्वार या साइड इंडिकेटर्सचा वापर पुरेशा प्रमाणात करीत नाहीत. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तो केला गेला पाहिजे.
विशेष करून शहरी भागातील रस्त्यांवरून जाताना ज्यावेळी रस्त्यावरील रांगा बदलून अन्य रांगेत दुचाकी नेली जाते तेव्हा तसेच डाव्या व उजव्या बाजूला एखाद्या गल्लीत जाताना आपण ज्या बाजूला जाणार आहोत, त्याचा संकेत देण्यासाठी साईड इंडिकेटरचा वापर करणे गरजेचे असते. केवळ दुचाकीच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाहनांना आज साईड इंडिकेटर्स दिलेले आहेत. त्याचा वापर प्रत्येक वाहनाने करायलाच हवा. मात्र दुचाकी वाहनांच्या चालकांनी या साईड इंडिकेटर्स वापर आवश्यक तेव्हा करायलाच हवा. कारण अपघात झाल्यास वा मागील बाजूने येणा-या वाहनाची धडक बसली तर दुचाकी स्वारांना व त्यांच्यामागे बसलेल्यांना ते खूपच प्राणघातक ठरू शकते. दुचाकीचे वजन, आकार या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. महामार्गावरून जातानाही दुचाकी स्वारांनी आपल्या वाहनाचा टेल लँप नीट आहे की नाही ते पाहाणे गरजेचे असते व साईड इंडिकेटर्सचे लाईटही चालू असणे आवश्यक असते. दिवसाच नव्हे तर रात्रीच्यावेळी महामार्गावरून जाताना अनेक दुचाकीस्वार साईड इंडिकेटर्सचा वापरही करीत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात घडल्याची उदाहरणे अधिक असतील. प्रत्येकवेळी दुचाकी ही सर्वसामान्यांचे दैनंदिन वापराचे साधन बनले असल्याने त्यांना अनेकदा या दुचाकीच्या सुयोग्य चालनापेक्षा केवळ हातातील एक साधन म्हणून वापरण्याची सवय झालेली असते. किंबहुना दुचाकी हे साधन असले तरी ते वाहन आहे हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठीच साईड इंडिकेटर्सचा नियमित व सुयोग्य वापर करणे केव्हाही महत्त्वाचेच.