सरकारकडून दिलासा; एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसन्स अथवा RC सोबतही चालवू शकता गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:21 PM2021-06-17T16:21:29+5:302021-06-17T16:24:13+5:30
Driving Licence and Rc: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दिलासा. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली नवी अॅडव्हायझरी.
ज्या वाहन चालकांचा ड्रायव्हिंग लायन्स किंवा व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एक्सपायर झालं आहे किंवा पुढील काही महिन्यांत एक्सपायर होणार आहे त्यांच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं गुरूवारी एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. तसंच राज्याच्या परिवहन विभागांना अशा चालकांचं चालान न कापण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या आदेशानुसार एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एक्सपायर्ड RC सोबत वाहन चालवणाऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सूट दिली जाणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. त्यानंतर विविध राज्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले. जरी परिस्थिती हळूहळू सामान्य स्थितीत परत येत असली, तरी धोका अद्याप संपलेला नाही. हे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून लोकांचा प्रवास सोयीस्कर होईल.
या अॅडव्हायझरीनुसार वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राव्यतिरिक्त वाहन फिटनेस प्रमाणपत्राची वैधता आणि सर्व प्रकारच्या परमिटची वैधतादेखील वाढविण्यात आली आहे. "सद्य स्थितीकजे पाहता, ज्या कागदपत्रांची वैधता लॉकडाऊनमुळे वाढवली जाऊ शकत नाही आणि जी १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे किंवा ३० सप्टेंबरपर्यंत संपेल त्या ३० सप्टेंबरपर्यं वैध मानली जातील," असं यात नमूद करण्यात आलं आहे.
Taking into consideration the need to prevent the spread of COVID-19, MoRT&H has advised the Enforcement Authorities that the validity of Fitness, Permit (all types), License, Registration or any other concerned document(s) may be treated to be valid till 30th Sept, 2021. pic.twitter.com/xe6QIvks5T
— MORTHINDIA (@MORTHIndia) June 17, 2021
यापूर्वीही वाढवण्यात आलेली वैधता
यापूर्वीही सरकारनं गेल्या वर्षी ३० मार्च, ९ जून, २४ ऑगस्ट, २० डिसेंबर आणि यावर्षी २६ मार्च रोजी कागदपत्रांची वैधता वाढवली होती. दरम्यान, यामध्ये PUC साठी सूट देण्यात आली नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांना पहिल्यांदा लर्निंग किंवा परमनंट लायसन्स घ्यायचा नसेल त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही आरटीमध्ये लाईनमध्ये उभं राहू नये असं आवाहनही सरकारनं केलं आहे. दरम्यान, विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवण्यावर कोणत्याही प्रकारची सूट नसल्याचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विना लायसन्स गाडी चालवल्यास पकडले गेल्यानंतर ५ हजार रूपयांचं चालान कापलं जाणार आहे.